गडहिंग्लज : सीमाभागातील कर्नाटक हद्दीतील गावांमधील रुग्णांनादेखील गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सेवा उपलब्ध करून द्या, अशी मागणी बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आली आहे. याबाबत प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज तालुका कर्नाटक राज्याच्या सीमेवर असून सीमेलगत असणा-या गावातील लोक व्यापार, उद्योग आणि वैद्यकीय सेवेसाठी गडहिंग्लजवर अवलंबून आहेत. परंतु, लॉकडाऊन काळात सीमाबंद असल्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
सीमाभागातील रुग्णांना ६० ते ७० किमी लांब बेळगावला जाऊन उपचार घेणे अशक्य होत आहे. येथील रुग्णालयावरील ताण कमी झालेला नाही. त्यामुळे सीमाभागातील लांबून येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. महाराष्ट्र शासनाला समितीची विनंती आहे की, सीमाभागातील रुग्णांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच सीमेवर वैद्यकीय कारणासाठी प्रवास करण्यास परवानगी द्यावी.
निवेदनावर, समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम यांच्या स्वाक्ष-या आहेत.