उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : शेअर बाजारात ३४ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास अडीच महिन्यांत ५४ हजार रुपये परत देण्याचे आमिष दाखवून श्रीमंता बझार कंपनीने गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला. कोरोनानंतर या कंपनीने सेमिनारच्या माध्यमातून शेकडो गुंतवणूकदारांना आकर्षित करून कोट्यवधी रुपये जमवले. यातून एजंट मालामाल झाले असून, गुंतवणूकदार कंगाल झाले आहेत. कंपनीत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटकातील ठकसेनांचा समावेश असल्याने फसवणुकीची व्याप्ती वाढत आहे.
कोरोनाची साथ ओसरल्यानंतर पुण्यातील श्रीमंता बझार या कंपनीने गडहिंग्लजमध्ये कार्यालय सुरू केले होते. वैशाली काशीनाथ गुरव (वय ३५, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) या महिलेने पुढाकार घेऊन श्रीमंता बझारची माहिती स्थानिकांना दिली.
कंपनीचा प्रमुख श्रीकांत रामाचार याच्या मदतीने वेळोवेळी सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना भुरळ घातली. केवळ अडीच महिन्यांत ३४ हजारांवर २० हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही जणांना परतावे देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणुकीचा ओघ वाढताच कार्यालयाला टाळे ठोकून कंपनीचे प्रमुख आणि एजंट पसार झाले होते.
हा प्रकार जुलै २०२१ ते मार्च २०२२ या काळात घडला. याप्रकरणी ऑक्टोबर २०२५ मध्ये गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला २३ गुंतवणूकदारांची सुमारे तीन कोटींची फसवणूक झाल्याचा उल्लेख फिर्यादीत केला होता. तपासानंतर गुंतवणूकदारांची संख्या वाढत गेली. गुरुवारी आणखी दोन गुंतवणूकदारांनी ५० लाखांची फसवणूक झाल्याचा जबाब आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत नोंदवला. (पूर्वार्ध)
कमिशनमुळे एजंट अन् गुंतवणूकदार वाढले
गुंतवणूक घेऊन येणाऱ्या एजंटना कंपनीकडून दरमहा आठ ते १० टक्के कमिशन दिले जात होते. त्यामुळे एजंट आणि गुंतवणूकदारही वाढले. अनेक एजंटनी त्यांना मिळालेले लाखो रुपयांचे कमिशन पुन्हा कंपनीत गुंतवल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली.
सर्व व्यवहार कंपनीच्या प्रमुखांकडे असायचे..
एक गुंतवणूकदार ३४ हजारांच्या पटीत कितीही गुंतवणूक करू शकत होता. ही रक्कम थेट राष्ट्रीयीकृत बँकेत कंपनीच्या खात्यावर भरली जात होती. त्याद्वारे कंपनीकडून गुंतवणूकदारांना आयडी क्रमांक मिळत होता. आयडीवर जमा झालेले पैसे आणि दिलेले परतावे, याची माहिती कंपनीचा प्रमुख रामाचार हाच सेमिनारमध्ये स्क्रीनवर दाखवत होता. त्यामुळे गुंतवणूकदारांकडे पैसे भरल्याच्या पावतीशिवाय इतर कोणतेही पुरावे नाहीत.
दोन कार जप्त
अटकेतील रणजित रावण आणि तुषार चोथे यांच्या घरांची पोलिसांनी झडती घेतली असून, त्यांच्या मालकीच्या दोन कार जप्त केल्या. आरोपींच्या इतर मालमत्तांचाही शोध सुरू आहे. या गुन्ह्यातील आणखी काही एजंटची नावे निष्पन्न होण्याची शक्यता तपास अधिकारी पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांनी व्यक्त केली.
या गुन्ह्यातील १३ पैकी ११ आरोपींना अटक झाली असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे. आरोपींच्या विरोधातील ठोस पुरावे जमा करण्यासाठी तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत येऊन तक्रारी द्याव्यात. - महेश इंगळे, पोलिस निरीक्षक, तपास अधिकारी.
Web Summary : Shrimanta Bazaar allegedly defrauded investors by promising high returns on investments. The company attracted investors through seminars, amassing crores. Agents profited while investors lost money. The scam involved individuals from multiple states, widening its scope. Police investigation is ongoing.
Web Summary : श्रीमंता बाज़ार पर निवेशकों को निवेश पर उच्च रिटर्न का वादा करके धोखा देने का आरोप है। कंपनी ने सेमिनारों के माध्यम से निवेशकों को आकर्षित किया और करोड़ों जमा किए। एजेंटों को फायदा हुआ जबकि निवेशकों को नुकसान हुआ। घोटाले में कई राज्यों के व्यक्ति शामिल थे, जिससे इसका दायरा बढ़ गया। पुलिस जांच जारी है।