सांगली : शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील प्राध्यापकांसाठी नोव्हेंबर महिन्यातच ‘बुरे दिन’ अनुभवास येत आहेत. नेहमी दहा तारखेपूर्वी होणारा पगार आता महिना संपत आला तरी न झाल्याने, प्राध्यापक मंडळींमधून नाराजी व्यक्त होत आहे. पगार कोणत्या कारणामुळे लांबणीवर पडला आहे, याची माहिती प्राध्यापकांसह संघटनांकडेही उपलब्ध नाही. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात येणाऱ्या सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजार प्राध्यापकांचा पगार तांत्रिक गोष्टीत अडकला आहे. नेहमी दहा तारखेपूर्वी प्राध्यापकांच्या हाती पगार येत होता. पण आॅक्टोबर महिन्याचा पगार आता नोव्हेंबर संपत आला तरी झालेला नाही. त्यामुळे प्राध्यापक मंडळींची चिंता वाढली आहे. अनेक प्राध्यापकांनी याबाबतची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याची कल्पना ना महाविद्यालयांना आहे, ना संघटनांना, ना शासकीय अधिकाऱ्यांना. त्यामुळे प्राध्यापकांच्या संभ्रमात भर पडली आहे. विद्यापीठ क्षेत्राशिवाय राज्यात अन्य कोणत्या ठिकाणी प्राध्यापकांचा पगार थांबला आहे का, याची माहितीही काही प्राध्यापकांनी घेतली. काही प्राध्यापकांनी घेतलेल्या माहितीनुसार, अमरावती, जळगाव आणि रायगड जिल्हा वगळता राज्यात अन्यत्रही प्राध्यापक मंडळींना पगाराची प्रतीक्षा करावी लागत आहे. पगाराला इतका विलंब कशामुळे होत आहे, याची कल्पना कोणालाही नाही. राज्याच्या शिक्षण विभागाकडेही याची माहिती घेण्याचा प्रयत्न संघटनांच्या प्रतिनिधींनी केला, मात्र त्यांनाही माहिती मिळू शकली नाही. एम फुक्टो संघटनेमार्फत येत्या १५ डिसेंबरपासून थकित वेतन आणि सेट-नेटबाधित शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात आता विलंबाने होणाऱ्या पगाराचा मुद्दाही मांडला जाण्याची शक्यता आहे. पगार वेळेत व्हावेत, या मुद्याचा समावेश आंदोलनाच्या विषयपत्रिकेवर घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्राध्यापकांचा पगार लांबणीवर
By admin | Updated: November 27, 2014 00:49 IST