कोल्हापूर : येथील कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकपदावरील नियुक्तीसाठी मुंबईतील सिडनेहॅॅम कॉलेजमध्ये मंगळवारी उच्च शिक्षण विभागाकडून पात्र उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामध्ये विद्यमान सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, राजाराम महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्रा. एच. एन. कटरे आणि प्रि-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका प्रा. डॉ. सोनाली रोडे यांनी मुलाखत दिली.
या सहसंचालकांच्या नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना उच्च शिक्षण विभागाने मुलाखतीला उपस्थित राहण्याचे ई-मेल गेल्या आठवड्यात पाठविले होते. त्यानुसार सिडनेहॅॅम कॉलेजमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली. पात्र असलेल्या २५ उमेदवारांच्या मुलाखती तीन सदस्यीय समितीने घेतल्या. त्यामध्ये कोल्हापूरमधील डॉ. अशोक उबाळे, प्रा. एच. एन. कटरे आणि डॉ. सोनाली रोडे यांचा समावेश होता. मुलाखतीतून निवड होणाऱ्या उमेदवाराकडे सध्या असलेल्याप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात पदभार सोपविण्यात येणार आहे. कोल्हापूरसह पुणे, औरंगाबाद, सोलापूर आदी विभागातील सहसंचालकांच्या नियुक्तीदेखील उच्च शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहेत.