लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील सांगली नाका रोडवर असलेल्या सारण गटारीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेले पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. यातून डेंग्यू, मलेरिया व चिकुन गुनियाचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही राजकीय दबावापोटी काम होत नसल्याच्या तक्रारीचे निवेदन नगरसेवक इकबाल कलावंत यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्याकडे केली. काम सुरू न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.
निवेदनात, सांगली नाका, सहकारनगर, वृंदावन कॉलनी, साईट नं. १०२, नारायण मळा, रायगड कॉलनी, मुसळे हायस्कूल रोड या परिसरातील सांडपाणी येथील सांगली रोडवर असलेल्या एका बझारमध्ये साचते. तेथे असलेली क्रॉस पाईप गाळाने भरली आहे. याबाबत अनेक प्रयत्न करूनही त्यातून सांडपाणी पुढे जात नाही. हे साचलेले पाणी पावसाळ्यात परिसरातील नागरिकांच्या घरात शिरते. याबाबत तत्काळ मार्ग काढण्याची मागणी केली आहे.