लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशात विस्कळीत झालेल्या व अपयशी ठरलेल्या लसीकरण धोरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकातून केला. वर्षाअखेरीस ७० टक्के लसीकरण पूर्ण करून मास्क काढून टाकण्याचा निर्धार राज्य सरकारने केल्याचेही म्हटले आहे.
कोरोनाच्या लाटेंचा अंदाज केंद्राला न आल्याने निवडणुका, धार्मिक कार्यक्रम, समारंभांना मुभा दिल्याने देशात संक्रमितांचे व मृत्यूचे प्रमाण वाढले. कोट्यवधी डोस पंतप्रधानांनी दुसऱ्या राष्ट्रांना देऊन वाहवा मिळवली व देशातील गोरगरिबांना वंचित ठेवले. राज्याने लसीची ग्लोबल निविदा काढल्यानंतर केंद्र सरकारने कंपन्यांना तंबी दिली. पश्चिम बंगाल राज्यामध्ये १८ वर्षांवरील जनतेला मोफत लस देऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्टिफिकेटवर आपला फोटो छापला. सर्वच मुख्यमंत्री स्वतःचा फोटो छापतील व आपले महत्त्व कमी होईल, म्हणून केंद्राने मोफत लसीची घोषणा केली.
महाराष्ट्राची लोकसंख्या, बाधितांचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाण पाहता लसीचे डोस त्या प्रमाणात मिळणे अपेक्षित होते, मात्र गुजरात, कर्नाटकला महाराष्ट्रापेक्षा जादा लस दिली, हे कशाचे निदर्शक आहे? त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने करण्यापेक्षा नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या घरासमोर निदर्शने करावीत.
ओबीसी आरक्षणाबाबतही देवेंद्र फडणवीस दिशाभूल करत असून, सत्ता दिल्यानंतर केंद्राकडून इम्पिरिकल डाटा देण्याची भाषा कशाचे धोतक आहे. राज्यपालांनी विधान परिषदेची यादी रखडवली, तसेच ओबीसीबाबत घडत आहे. याबाबत एकाच व्यासपीठावर येण्याची तारीख भाजपने द्यावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, अमरसिंह पाटील, संजय मोहिते, शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, राजेश लाटकर, विनायक फाळके, आदिल फरास यांनी पत्रकातून दिले.
...तर आठ दिवस उठणार नाही
मंत्री हसन मुश्रीफ यांचे वजन पावशेर आहे की, १०० किलो ते प्रत्यक्ष जवळ जाऊन पहा. त्यांचा पाय जरी तुमच्या पायावर पडला तरी तुम्ही आठ दिवस उठणार नाही. बालीश विधाने यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा पत्रकातून दिला.