कोल्हापूर : कोल्हापूरला मोठी शाहिरी परंपरा लाभली आहे. या परंपरेचा वारसा जपणाऱ्या राजू राऊत यांच्यासारख्या शाहिरांमुळे ही कला आता परदेशातही सादर होणार असून, हा या परंपरेचा गौरव असल्याचे गौरवोद्वार ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी काढले.शाहिरी कला मॉरिशसमध्ये सादर करण्यासाठी शाहीर राजू राऊत व सहकारी आज, गुरुवारी मॉरिशसला रवाना होत आहेत. यानिमित्त मराठी नाट्य-चित्रपट कलाकार-तंत्रज्ञ मल्टीपर्पज असोसिएशन आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, शाहीर राऊत आपल्या पथकाच्या माध्यमातून सतत विविध प्रयोग करीत असतात. आता तर त्यांचे पथक थेट मॉरिशसमध्ये जाऊन पोवाडा सादर करणार असून, ही देशातील पहिलीच घटना आहे. सत्कारानंतर राजू राऊत म्हणाले, परदेशात जाऊन शाहिरी सादर करावी, ही कला सातासमुद्रापार पोहोचवावी, हे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. आता मॉरिशसच्या निमित्ताने ते पूर्ण होत आहे. राऊत यांच्यासोबत मॉरिशसला डफ, ढोलकी, तुणतुणे, झांज, दिमडी वादकांचा एकूण पाचजणांचा संच जाणार आहे. त्यांचे सहकारी भार्गव कांबळे (ढोलकी), अजित आयरेकर (हार्मोनियम), महेश पाटील आणि राष्ट्रपतिपदक विजेते शामराव खडके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष आकाराम पाटील, उपाध्यक्ष सुनील माने, महेश पन्हाळकर, अरुण चोपदार, महामंडळाचे कार्यवाह रणजित जाधव, ज्येष्ठ समीक्षक प्रसन्न जी. कुलकर्णी, सतीश बिडकर, विजय शिंदे, उदय मराठे, बाळू बारामती, रवींद्र बोरगावकर, आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील मराठी चित्रपट, नाट्य कलाकार तंत्रज्ञ असोसिएशनच्या वतीने बुधवारी शाहीर राजू राऊत यांचा ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रणजित जाधव, अरुण चोपदार, आकाराम पाटील, महेश पन्हाळकर, सतीश बिडकर उपस्थित होते.
कोल्हापूरच्या शाहिरी परंपरेचा गौरव
By admin | Updated: February 16, 2017 00:06 IST