कसबा बावडा : दत्त जयंतीनिमित्त रविवारी (दि. ७) जिल्ह्यात सुमारे शंभराहून अधिक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, किमान ५० हजारांहून अधिक भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतील, अशी शक्यता आहे. शहर व उपनगरातही दहा ते बारा ठिकाणी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात पाचशे ते तीन हजार भाविकांना पुरेल इतका महाप्रसाद केला जातो, तर ग्रामीण भागात तीनशे ते चारशे लोकांना पुरेल इतका महाप्रसाद केला जातो.देवस्थान भक्त कमिटी, भाविक आणि दानशूर व्यक्तींच्या सरळ हाताने केलेल्या मदतीवर या प्रसादाचे आयोजन केले जाते. शहर आणि ग्रामीण भागातील महाप्रसादाची संख्या आणि प्रत्येकी ५०० भाविकांनी लाभ घेतला, असा जरी सरासरी हिशेब केल्यास सुमारे ५० हजार भाविकांची संख्या होते. तसेच प्रत्येक वर्षी केलेला महाप्रसादही संपतो. महाप्रसादासाठी काही दानशूर व्यक्तींकडून पैसे व धान्याच्या रूपात मदत होते. तशीच मदत टेबल, भांडी, मांडव, पाण्याचा टॅँकर, आचारी, गॅस सिलिंडर, मोफत दिले जाते. काहीजण अशा वस्तू कमी भाडे आकारूनही उपलब्ध करून देतात.शिस्तबद्ध होतो महाप्रसादमहाप्रसादाचे वाटप सकाळी ११ ते दुपारी ३ वेळेत चालते. यावेळी भाविक रांगेत उभे राहून शिस्तबद्धरीत्या महाप्रसादाचा लाभ घेतात. काही ठिकाणी ग्रामीण भागात दत्त जयंती दिवशीच महाप्रसाद केला जातो. तर बहुसंख्य ठिकाणी दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होतो. पूर्वी महाप्रसाद म्हटले की, प्रसाद म्हणून प्रामुख्याने खीर, पांढरा भात, आमटी, इतकाच मेनू असायचा. परंतू आता प्रसाद म्हणून खीर हा पदार्थ गायब होऊ लागला आहे. खीरीच्या जागी शिरा, पुरी, श्रीखंड, जिलेबी, लाडू, मसाला भात, कोशिंबीर, बटाटा बाजी, पनिर, मट्टा असे पदार्थ आले आहेत. तसेच पत्रावळ्या गायब होऊन ताटे- वाट्या आल्या आहेत.
प्रसादाचा मेनू बदलतोय...!
By admin | Updated: December 4, 2014 23:34 IST