कोल्हापूर : जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हा समितीतर्फे रविवारी (दि़ ३०) समितीचे राज्यस्तरीय सहअध्यक्ष आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-संघटक श्याम मानव यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे़ महावीर कॉलेज येथील आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे़ या सभेत मानव वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायद्यावर चमत्कार प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत़ जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या हस्ते या जाहीर सभेचे उद्घाटन होणार असून, जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार, तसेच समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त एस़ बी़ भंडारे यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती सहायक समाजकल्याण आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली़ गायकवाड म्हणाले, शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालून या प्रथांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा केला आहे़ या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समित्या राज्य, विभाग आणि जिल्हा स्तरावर तयार करण्यात आलेल्या आहेत़ कोल्हापूर जिल्हा समितीने पहिला टप्पा म्हणून श्याम मानव यांची जाहीर सभा आयोजित केली आहे़ या सभेत ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा’ या विषयावर चमत्कार प्रात्यक्षिकांसह मानव मार्गदर्शन करणार आहेत़ जिल्हास्तरीय समितीमध्ये सहाजणांचा समावेश असून, या समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त जिल्हाधिकारी, तर सदस्य सचिवपदी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त असतील़ सदस्यांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा प्रकल्प समन्वयक, माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच अशासकीय सदस्यांचा समावेश असणार आहे़ जाहीर सभा आयोजित करणे, शाळा, महाविद्यालयांत कार्यक्रम आयोजित करणे, पोलीस, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे तसेच तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, बचत गट, पोलीसपाटील यांचे प्रशिक्षण आयोजित करणे ही कामे जिल्हास्तरीय समितीकडे आहेत, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली़ यावेळी शैला कुरणे, समन्वयक सुनीता कांबळे, एम़ ए़ नयनी, दामिनी हवालदार उपस्थित होते़ जादूटोणा करणाऱ्यांना तुरुंगाची हवा भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे किंवा त्याच्यावर शारीरिक अत्याचार करणे, गुप्त धनासाठी नरबळी देणे किंवा देण्याचा प्रयत्न करणे, अंगात येण्याचे ढोंग करून आपले न ऐकल्यास वाईट परिणामाची भीती घालणे, जारणमारण, तसेच चेटुकाच्या नावाखाली मारहाण, भूतपिशाच्चांना आवाहन करून भीती घालणे, वेगवेगळ्या चमत्कारांचा प्रयोग करून आर्थिक प्राप्ती करणे हे अपराध सिद्ध झाल्यास संबंधितांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल होतील़
प्रात्यक्षिक, जागृतीद्वारे होणार अंधश्रद्धेवर प्रहार
By admin | Updated: November 27, 2014 23:55 IST