वडणगे : वरिष्ठ लिपिकाकडून मानसिक त्रास होत असल्याची तक्रार करत वडणगे, ता. करवीर येथील देवी पार्वती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील अनुकंपा तत्त्वावरील सहायक शिक्षिका मीनाक्षी तानाजी शेलार यांनी २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, संस्थेने १५ फेब्रुवारीपर्यंत चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आदेश दिल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले. दरम्यान उपोषणाच्या ठिकाणी काही काळ तणावपूर्ण वातावरण होते.
सहायक शिक्षिका मीनाक्षी शेलार यांनी वरिष्ठ लिपिक आपल्याला नाहक मानसिक त्रास देत असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग व राज्य महिला आयोगाकडे केली होती. मात्र, यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने त्यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.
26 जानेवारी रोजी सकाळी शाळेच्या पटांगणात त्या उपोषणाला बसण्यासाठी आल्या असता संस्था पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने शेलार यांनी उपोषण स्थगित केले.