लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहापूर परिसरातील गैबान खणीमध्ये आढळलेल्या मृत युवकाच्या खुनाची शक्यता शवविच्छेदन अहवालात वर्तवली आहे. त्यानुसार शहापूर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी (दि. ५) सायंकाळी इचलकरंजी-शहापूर रस्त्यावरील खणीत एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला होता. त्याचे वय अंदाजे ४० वर्षे असून, अंगात पिवळसर ठिपक्याचा शर्ट व काळी पॅण्ट होती. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला होता. त्याचा बुधवारी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये या युवकाच्या चेहरा व कपाळावर खोलवर जखम आढळून आली. त्यामुळे त्याचा खून झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मृत युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, या युवकाबाबत काही माहिती असल्यास संबंधितांनी शहापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.