चंदगड : कोरोना महामारीमुळे सर्वांची मानसिकताच बदलली, अर्थव्यवहार, गाठीभेटी बंद झाल्याने आरोग्य बिघडले. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढवा, सकारात्मक रहा, छंद जोपासा, सकारात्मकता हीच कोरोनाविरुध्दची यशस्वी लढाई आहे, असे मत डॉ. वंदना गुरव यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ऑनलाईन कोरोना प्रबोधनपर व्याख्यानमालेत ‘कोरोना काळातील आरोग्य संर्वधन’ या विषयावर त्या बोलत होत्या.
डॉ. गुरव म्हणाल्या, स्वच्छतेच्या सवयी आयुष्यभर आरोग्यपूर्ण ठरतात. कोरोना काळात भरपूर खायला हवे, अधिक काळासाठी उपाशी राहू नका, ताजे जेवण घ्या, मी आजाराला हरविण्यासाठी खायला पाहिजे ही इच्छाशक्ती बाळगूनच यशस्वी व्हाल. या रोगाला टक्कर देण्यासाठी सकस आहार, व्यायाम, विश्रांती व आवश्यक झोप यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. मानसिक आरोग्य, ताणतणावापासून दूर राहा आणि धीट बना, असा सल्लाही यावेळी डॉ. गुरव यांनी दिला.
डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी प्रस्तावना करून ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ या शिवाजी विद्यापीठांतर्गत राबविल्या जाणाऱ्या अभियानाचे स्वरूप सांगून पाहुण्यांचा परिचय करून दिला.
अशोक जाधव म्हणाले, कोरोनाने आपल्या सर्वांना घरी बसवले. पण, तत्रंज्ञानामुळे आपण एकत्र आलो आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्र. प्राचार्य पी. ए. पाटील, डॉ. राजेश घोरपडे, प्रा. सी. एल. तेली आदी उपस्थित होते. डॉ. जे. जे. व्हटकर यांनी आभार मानले.