लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील पॉपलीन कारखानदारांचे कापड उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विकले जात आहे, तसेच दररोज सुताचे वाढते दर व कापडाला कमी मागणी असल्यामुळे शुक्रवार (दि. २५) पासून पॉपलीन कापडाचा दर सुधारेपर्यंत शहरातील पॉपलीन उत्पादन करणारे यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.
यामुळे शहरातील ८ ते १० हजार यंत्रमागावरील दररोज अंदाजे १५ लाख मीटर कापडाचे उत्पादन ठप्प होणार असून, महिन्याला १०० कोटींचा फटका बसणार आहे.
यावेळी इचलकरंजीसह भिवंडी, मालेगाव व विटा येथील यंत्रमाग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सर्व यंत्रमाग केंद्रांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे ठरले. मागील आठवड्यात उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कमी उत्पादन करून परिस्थितीची पडताळणी करण्यात आली. त्यातूनही मिळणाऱ्या दरापेक्षा उत्पादन खर्च वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने अखेर उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
किमान उत्पादन सुरू राहिल्यास कामगारांचा काही प्रमाणात उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार होता. पूर्ण बंदमुळे कामगारांना काम मिळणार नाही, तसेच कारखानदारांनाही भाडे, वीज बिल, कारखाने बंद राहिल्याने पुन्हा सुरू करताना येणारा खर्च हा अतिरिक्त भार पडणार आहे; परंतु उत्पादन घेऊनही खर्च परवडत नसल्याने अखेर हा निर्णय घेतला. बैठकीस कैश बागवान, दिलीप ढोकळे, श्रीशैल कित्तुरे, सुनील पाटील, तुकाराम सावंत, चंद्रकांत पाटील, प्रमोद महाजन यांच्यासह यंत्रमाग कारखानदार उपस्थित होते.
फोटो ओळी
२३०६२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीत पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेने खर्च वाढल्याने उत्पादन बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेतला.