विजय सिंग पाटील
लाखो रुपये खर्च करून आकर्षक पद्धतीने बांधलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना हॉल व सभागृहाची दुरवस्था झाली आहे. या सभागृहाची दुरुस्ती करून संभाव्य पडझडीमुळे होणारे लाखोंचे नुकसान टाळावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना हॉल व सभागृहाच्या घुमटावरील काचा फुटलेल्या आहेत. त्याची अवस्था अनेक वर्षांपासून तशीच आहे. त्यामुळे याठिकाणी बाहेरून येणाऱ्या नागरिकांसमोर शाहुंच्या नगरीची प्रतिमा मलीन होत आहे. या इमारतीच्या दुरवस्थेमुळे इमारतीचा वापर होत नाही. त्यामुळे सभागृहातील खुर्च्या किंवा इतर फर्निचर ताडपत्रीमध्ये झाकून ठेवण्याची नामुष्की विभागावर आली आहे. मुसळधार पावसामुळे होणाऱ्या गळतीने भिंती भिजून त्यांची पडझड होण्याचा धोका आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास वास्तूवर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सभागृहाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
कोट - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या देखण्या सभागृहाच्या झालेल्या पडझडीमुळे ही वास्तू वापराविना पडून आहे, ही वस्तुस्थिती आहे. लवकरात लवकर तिची दुरुस्ती व्हावी म्हणून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत.
- विशाल लोंढे
सहाय्यक आयुक्त,
सामाजिक न्याय विभाग,
कोल्हापूर.