कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील ‘एव्हीएच’ प्रकल्पात शनिवारी दिवसभर जाळपोळ, दगडफेक झाली. अशा स्फोटक वातावरणात आंदोलकांचा रोष असलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके आणि उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर दिवसभर अडकले. येथील कार्यालयातून त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत यश आले नाही. अनेक वेळा ते मोबाईललाही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या काळजीत अधिक भर पडत राहिली. ‘एव्हीएच’ प्रकल्प प्रदूषणकारी असल्याचा चंदगडकरांचा आरोप आहे. त्याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर काळ्या धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्यानंतर प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाने जोर घेतला. गेल्या महिन्यात चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, एव्हीएच विरोधी कृती समितीच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर गेल्या महिन्यात मोर्चा काढला. परिणामी आंदोलकांचा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर रोष वाढला. एव्हीएच सुरू होण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोपही झाला होता. पर्यावरणासंबंधीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा असल्यामुळे चंदगड तालुक्यात सकाळी अधिकारी डोके आणि होळकर गेले. चंदगड तालुक्यातील संतप्त वातावरणामुळे जाताना खासगी वाहन घेऊन गेले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एव्हीएच प्रकल्प पाहण्याची इच्छा व्यक्त केली. प्रकल्प पाहण्यासाठी गेले. त्याचवेळी प्रकल्पात जाळपोळ सुरू झाली. त्यामुळे खासगी वाहनातील चालक पळून गेले. डोेके आणि होळकर एव्हीएच प्रकल्पातच अडकले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना आंदोलक ओळखत नसल्यामुळे ते कसेतरी भीतभीत मार्ग काढून निघून गेले. मात्र, डोके आणि होळकर यांना अनेक आंदोलन ओळखतात. त्यामुळे त्यांना बाहेर पडणे धोकादायक वाटू लागले. परिणामी दोन अधिकारी अडकले. आंदोलकांना याची माहिती नव्हती. माहिती होऊ नये, याची खबरदारी प्रकल्पातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी घेतली. (प्रतिनिधी)
प्रदूषण नियंत्रणचे अधिकारी अडकले
By admin | Updated: March 8, 2015 00:48 IST