कुरुंदवाड : राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असावे. निवडणुकीनंतर विकासकामाला महत्त्व दिल्यास गावचा विकास साधता येतो. जि. प. सदस्य अशोकराव माने यांना रत्नाप्पाण्णा कुंभार, सा. रे. पाटील यांच्या सानिध्यात समाजकारणाचे धडे मिळाल्याने स्वत:ला समाजकारणात वाहून घेतले आहेत. त्यांना आमदारकी मिळाली की राज्यातील निधी मतदारसंघात खेचून आणण्याची धमक त्यांच्यात आहे, असे प्रतिपादन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
तेरवाड (ता. शिरोळ) येथे जि. प. सदस्य अशोकराव माने यांच्या फंडातून पूर्णत्वास आलेल्या दोन कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मीबाई तराळ होत्या. प्रारंभी गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन जि. प. सदस्य माने व पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जि. प. सदस्य अशोकराव माने म्हणाले, माझ्या मतदारसंघात सर्वाधिक निधी आणण्यात यशस्वी ठरलो आहे. उर्वरित कार्यकाळात आणखीन निधी देणार असून ग्रामपंचायतीने प्रलंबित कामाच्या निधीसाठी प्रस्ताव देण्याचे आवाहन केले.
या वेळी माजी सरपंच संजय अनुसे, शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, मंगल चव्हाण यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास शशिकला वाडीकर, संतोष भुयेकर, अरुण नल्ला, सुगंधा वडर, पंचायत समिती बांधकाम शाखाअभियंता व्ही. आर. कोळी, ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर आदी उपस्थित होते. विजय गायकवाड यांनी आभार मानले.
फोटो - ०३०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - तेरवाड (ता. शिरोळ) येथे जि. प. सदस्य अशोकराव माने यांच्या फंडातून विविध विकासकामांचे उद्घाटन गणपतराव पाटील, अशोकराव माने यांच्या हस्ते झाले.