तारदाळ : खोतवाडी-तारदाळ (ता.हातकणंगले) या गावचे राजकारण सध्या पाण्याभोवती फिरताना दिसत आहे. गेली दोन वर्षे भारत निर्माण पाणीपुरवठा योजना गैरकारभाराच्या विळख्यात सापडली आहे. अनेकवेळा आंदोलने करूनही राजकीय हस्तक्षेपामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून लक्ष घालून प्रयत्न होणार का, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.
भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेतील गैरकारभाराबाबत वारंवार आंदोलने झाल्याने सन २०१९-२० चे सरकारी ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये संबंधितांना बारा लाख रुपये तत्काळ भरण्यास सांगण्यात आले होते. त्याचबरोबर ५० लाखांचा लेखी खुलासा मागविला होता. हा ऑडिट अहवाल ४ एप्रिलला प्राप्त झाला. त्यानंतर १२ जुलैपर्यंत रक्कम देणे आवश्यक होते. परंतु पाणीपुरवठा समितीने जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. त्याकडे गटविकास अधिकारी यांनीही दुर्लक्ष केले.
सध्याच्या पाणीपुरवठा योजनेच्या २५ पैकी १३ संचालकांच्या कारभाराला विरोध आहे. कोणतीही बैठक न घेता अध्यक्ष बेताल खर्च करतात, असा त्यांच्यावर आरोप आहे. गावसभेमध्ये दोषींवर कारवाई करण्याचे ठरले, परंतु काहीच झाले नाही. गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु गावातील लोकप्रतिनिधी राजकीय हस्तक्षेप करतात. योजनेच्या अध्यक्षांना काही सदस्यही पाठबळ देतात. त्यामुळे ‘सबका साथ-सबका विकास’प्रमाणे कामकाज सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांतून तीव्र नाराजी असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
...........
सन २०२०-२१ चे ऑडिट व्हावे
गतवर्षीच्या ऑडिट अहवालात सुमारे ६२ लाखांचा गोंधळ दिसतो. त्यामुळे सन २०२०-२१ चेही सरकारी ऑडिट व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.