सातारा : महिलांना फसविण्याचे प्रकार वाढले असून दागिन्यांना पॉलिश करतो, असे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांत तब्बल ३९ महिलांना फसविल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये सुशिक्षित महिलांची संख्या लक्षणीय आहे. अनेकदा पोलीस आवाहन करत असतात. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महिलांची फसगत होत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात एका अपार्टमेंटमध्ये महिलेला दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून तब्बल सात तोळ्यांचे दागिने पळवून नेले. या प्रकारानंतर आजपर्यंत अशा कितीप्रकारच्या घटना घडल्या, याचा शोध घेतला असता, धक्कादायक माहिती समोर आली. गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात अशा प्रकारे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या महिलांची संख्या ३९ आहे. या महिलांकडून तब्बल १६८ तोळे सोने चोरीस गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. पुर्वी फिरस्ते व्यवसायिक दागिण्यांना पॉलिश करत होते. मात्र, कालांतराने ही पद्धत बंद झाली. त्याचे कारण म्हणजे लुटमारीचे प्रकार वाढले. फिरस्त्या व्यवसायिकांना असा व्यवसाय करणे मुश्कील बनले होते. परंतु अलीकडे पुन्हा असे व्यवसायिक दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून फिरत आहेत. मात्र ते सर्व व्यवसायिक बोगस आहेत. घरी जावून दागिन्यांना पॉलिश करण्याची पद्धत बंद झाली. ज्वेलर्सच्या दुकानात जावूनच महिला आपले दागिने पॉलिश करून घेत असतात. मात्र अशा भुलथापांना बळी पडणाऱ्या महिलांमध्ये वाढ होत आहे. विशेषत: सुशिक्षित महिलांचे यामध्ये मोठे प्रमाण आहे. कमी किमतीमध्ये दागिन्यांना पॉलिश करून मिळतेय, तेही कुठेही न जाता घराच्या घरी. त्यामुळे महिलावर्ग कसलीही शहानिशा न करता दारात येणाऱ्या फिरस्ते विक्रेत्याकडे घरात असतील तेवढे दागिने काढून देतात.दागिन्यांना पॉलिश करण्याचा बहाणा करून ते लोक एका भांड्यात रंग टाकतात. जेणेकरून दागिने दिसणार नाहीत, अशी ते पुरेपूर खबरदारी घेत असतात. त्यानंतर घरात असणाऱ्या महिलेला काहीतरी वस्तू आणायला सांगून काही क्षणातच दागिने घेऊन पलायन करतात. किंवा हातचलाखीकरून भांड्यातील दागिने काढून घेतात. काही वेळ हे दागिने भांड्यात तसेच ठेवा, तासाभरानंतर ते दागिने बाहेर काढा, असे सांगून उलट त्या महिलेकडून आणखी पैसेही घेतात. त्यानंतर ते निघून जातात. तासाभरानंतर भांड्यातील दागिने ज्यावेळी ती महिला काढत असते, त्यावेळी भांड्यात अक्षरश: दगड असतात. आपली फसवणूक झाल्याचे समजताच ती महिला आरडाओरड करते, परंतु त्याचा काहीएक उपयोग होत नाही. तोपर्यंत तो फिरस्ता व्यवसायिक गायब झालेला असतो. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर औपचारीकता पूर्ण होते. मात्र दागिने परत मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे महिलांनी अशा भामट्यांकडून सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस करतात, मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने असे प्रकार घडत आहेत, हेही महिलांनी लक्षात ठेवले पाहिजे. (प्रतिनिधी)-----‘दागिण्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिणे लुटले जातात. अशाप्रकारे कधीही दागिण्यांना पॉलिश केले जात नाही. हे महिलांनी लक्षात घेतले पाहिजे. जर असा कोणी संशयित आल्यास महिलांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.’राजीव मुठाणे,पोलीस निरीक्षकचोरटे सावज कसे हेरतात...-पॉलिशचा बहाणा करून दारोदारी फिरतात.-घरात जास्त लोक असले तर थातूरमातूर बहाणे करून पळ काढतात.- शक्यतो घरात एकटी-दुकटी महिला असेल तरच ते डाव साधतात.-जवळ दागिणे ठेवून महिलांना भुरळ घालतात. -एवढे दागिणे आम्ही पॉलिश केले असा बहाणा करतात.-तातडीने पळून जाता यावे, यासाठी दुचाकीवरून येतात.-शक्यतो रहदारीच्या ठिकाणी चोरी करणे टाळतात.
बहाणा पॉलिशचा... हेतू लूटमारीचा!
By admin | Updated: July 22, 2014 22:15 IST