तानाजी घोरपडे - हुपरी -पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेबरोबरच सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांची सराफ व्यावसायिकांकडे पाहण्याची दृष्टीच पूर्वग्रहदूषित झाली आहे. त्यामुळे चोरट्यांच्या शब्दांवर विश्वास ठेऊन कोणत्याही प्रकारची शहनिशा न करता ‘पोलीस मामा’ सरळ-सरळ सराफांच्या कॉलरला हात घालत आहेत. कायद्याची भीती व खाकी वर्दीचा रुबाब दाखवत पेलीस सराफांना मानसिक त्रास देत आहेत. पोलिसांच्या अशा वृत्तीला हुपरी परिसरातील सराफ वैतागून गेले आहेत. सर्वच सराफांना पोलिसांच्या या दडपशाहीचा कमी-जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत असतानाही जिल्हा सराफ संघटना ‘गांधारीची’ भूमिका घेत आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये कोठेही चोरी झाली की, एखादा भुरटा चोर पकडायचा, त्याचा योग्य समाचार घ्यायचा. पोलिसांच्या प्रसादाला भिऊन चोरटाही गुन्हा कबूल करतो. यापूर्वी एखाद्या चोरीतील फुटकळ सोने, दागिने, घरातील विविध अडचणी सांगून सराफाकडे विकलेले असतात. याची आठवण यावेळी होते. पोलिसांच्या माराला भिऊन त्या सराफाचे नाव घ्यायचे. पोलीस त्या चोराला घेऊन सरळ-सरळ सराफाच्या दुकानात जातात. या चोराने तुम्हाला चोरीतील सोने विकले आहे. ते परत द्या, नाहीतर आमच्यासोबत तुम्हाला यावे लागेल. चोरीचा माल घेतल्याबद्दल तुम्हालासुद्धा आत बसावे लागेल, ‘मोक्का’ लावला जाईल, अशी भीती दाखविली जाते. त्यामुळे भीतीने सराफांची गाळण उडत आहे. याशिवाय लाखो रुपयेही उकळले जातात. याबाबत तो सराफ कुणाकडेही दाद मागू शकत नाही. तोंड दाबून बुक्यांचा मार सराफ मंडळी न केलेल्या गुन्ह्यासाठी खात असतात.याबाबत हुपरी परिसर सराफ संघटनेचे अध्यक्ष सतीश भोजे व खजिनदार संजय माने म्हणाले, चोरांचा जबाब व साक्षीवरती न्यायालयेही विश्वास ठेवत नाहीत. मात्र, पोलीस अधिकारी याच चोरांच्या जबाबावर विश्वास ठेऊन सराफांना नाहक त्रास देत असतात. ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने सराफांना पोलीस ठाण्यात आणून चोरांसोबतच कोठडीत बसविले जाते. काही-काही वेळा एकाच घटनेतील दोन-दोन वेळा पोलीस वसुली करतात. समाजातील प्रतिष्ठेला धक्का लागू नये व पोलीस अत्याचाऱ्याला सामोरे जावे लागू नये म्हणून सराफांना पोलिसांची दडपशाही मुकाट्याने सहन करावी लागते. सराफांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा यासाठी पोलिसांची अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे.
सराफांवर ‘पोलिसी’ रुबाब
By admin | Updated: October 23, 2014 00:03 IST