कोल्हापूर : लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशीही पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करीत कारवाईचा धडाका लावला. जिल्ह्यात मंगळवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत सुमारे सात लाख ६३ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. त्यामध्ये तब्बल १४७८ वाहनांवर कारवाई करीत गुन्हे नोंदविले.
कोरोना महामारीला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी संपूर्ण पोलीस यंत्रणा रस्त्यांवर राहून बंदोबस्तात तैनात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणीही रस्त्यावर फिरकत नाही. लॉकडाऊनच्या नियमावलीचा भंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केल्याने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे मंगळवारी तिसऱ्या दिवशीही नागरिकांनी पोलीस प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिला.
दिवसभर रस्ते वाहतुकीविना ओस पडले होते. रस्त्यावरून फक्त अत्यावश्यक सेवेतीलच वाहने धावत होती. चौका-चौकांत पोलीस बंदोबस्त सर्वच वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करत होता. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर मात्र कायद्याचा बडगा उगारला जात होता. विनामास्क फिरणाऱ्या ५८७ जणांकडून एक लाख ९८ हजार रुपये दंड वसूल केला; तर मॉर्निंग वॉकप्रकरणी दिवसभरात ३९० जणांना ताब्यात घेऊन त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले व त्यांच्याकडून एक लाख ७४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.
पोलिसांना तात्पुरता निवारा
गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पाऊस सुरू आहे. त्यातच बंदोबस्तातील रस्त्यावरील पोलिसांचे अतोनात हाल झाले. अचानक पाऊस आल्यास पोलिसांना आडोसा घेण्याची वेळ येत होती. त्याची दखल घेऊन पोलिसांना पावसापासून बचाव करण्यासाठी कोल्हापूर शहरात मंगळवारी ताराराणी चौक, सीपीआर चौक, मिरजकर तिकटी, आदी ठिकाणी तंबू उभारले आहेत. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला.
दिवसभरातील कारवाई
- विनामास्क : ५८७ जण (दंड वसूल : १,९८,००० रु.)
- वाहनांवर गुन्हे : १३१९ वाहने (दंड वसूल : २,९९,८०० रु.)
- मॉर्निंग वॉक : ३९० जण (दंड वसूल : १,७४,५०० रु.)
- जप्त दुचाकी : १५९
- आस्थापना कारवाई : २४ जण (दंड वसूल : ९१,५०० रु.)
फोटो नं. १८०५२०२१-कोल-पोलीस०१
ओळ : कोल्हापुरात गेले तीन दिवस पोलिसांनी अहोरात्र पावसात कडक लॉकडाऊनचा बंदोबस्त केला. त्यामुळे बंदोबस्त करताना पोलिसांना पावसापासून बचाव करण्यासाठी शहरात मंगळवारी ठिकठिकाणी प्रमुख चौकांत तंबू उभारले होते.
===Photopath===
180521\18kol_8_18052021_5.jpg
===Caption===
ओळ : कोल्हापूरात गेले तीन दिवस पोलिसांनी अहोरात्र पावसात पोलिसांनी कडक लॉकडाऊनचा बंदोबस्त केला. त्यामुळे बंदोबस्त करताना पोलिसांना पावसापासून बचाव करण्यासाठी शहरात मंगळवारी ठिकठिकाणी प्रमुख चौकात तंबू उभारले होते.