लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चोवीस तास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनाही मूलभूत सुविधांची गरज असते; पण सध्या जिल्ह्यातील पोलीस ठाणी आणि चौक्यांची अवस्था फारच दयनीय आहे. त्या दुरुस्त करून सर्वसुविधांनी ‘अपडेट’ करण्यासाठी पोलीस दलातर्फे जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीटीसी) साडेतीन कोटी रुपये निधीचा प्रस्ताव पाठविला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १०८९ गावे असून, सुमारे ३० पोलीस स्टेशन, तर ३१ पोलीस चौक्या (दूरक्षेत्र) आहेत. सुमारे २९४० पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर आहे, त्यापैकी २६८० कर्मचारी कार्यरत आहेत. बहुतांशी पोलीस चौक्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे, इमारती कमकुवत आहेत. बहुतांशी इमारतीत ना शौचालय- ना बाथरूम- ना लाईट, आदी असुविधा आहेत. पावसाळ्यात या इमारती गळक्या आढळतात. निधीअभावी त्या दुरस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
बहुतांशी चौक्यांची अपुरी जागा असल्यामुळे तेथे पोलिसांना राहता येत नाही. अधीक्षक बलकवडे यांनी नुकताच सर्व पोलीस ठाणी व चौक्यांचा दौरा करून सुविधांचा आढावा घेऊन त्या दुरुस्त करून ‘अपडेट’ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले असून, ते जिल्हा नियोजन मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विकासकामांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोनाचा पादुर्भाव ओसरल्याने आता राज्य शासनाचे अर्थचक्र हळूहळू सुरू झाले. त्यामुळे या प्रस्तावाचा अडथळा दूर झाला आहे.
भाड्याने घेणार इमारती
ज्या पोलीस चौक्यांच्या इमारती एकदमच कमकुवत बनल्या, अरुंद जागेत आहेत, त्या ठिकाणी दुसऱ्या भाड्याने इमारती घेऊन चौक्या सुरू करण्यावर अधीक्षक बलकवडे यांचा भर राहणार आहे.
कोट..
सर्वच पोलीस चौक्या कार्यरत झाल्यास तक्रारदाराला मुख्य पोलीस ठाण्यापर्यंत पायपीट करावी लागणार नाही. त्यासाठी पोलीस ठाणे, चाैक्या दुरुस्तीचा प्रस्ताव (डीपीटीसी)कडे पाठविला.
- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा
पॉईंटर
पोलीस ठाणे : ३०
पोलीस चौक्या (दूरक्षेत्र) : ३१
पोलीस कर्मचारी संख्या (मंजूर) : २९४०
पोलीस कर्मचारी कार्यरत : २६८०
(तानाजी)