जयसिंगपूर : शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी क्रेनदेखील सुरू करण्यात आली आहे. मात्र, शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्याऐवजी बेशिस्तपणाच दिसून येत आहे. क्रांती चौकात लावण्यात येणाऱ्या बेशिस्त वाहनांवरील कारवाईकडे वाहतूक पोलिसांचे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वतंत्र वाहतूक शाखेचा प्रस्ताव मंजूर करून वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.
सांगली-कोल्हापूर महामार्गावर जयसिंगपूर शहर वसले आहे. दहा वर्षांपूर्वी क्रांती चौकात वाहतूक कोंंडीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल उभारण्यात आला होता. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. फेब्रुवारी २०१८ मध्ये पालिकेच्या सभेत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला होता. मात्र, त्यामध्येही सातत्य राहिले नाही. त्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था निर्माण करता येऊ शकते, हा विषय पालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला होता.
सम-विषम पार्किंगच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबवून वाहतुकीला शिस्त लागली. पण महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न आजही कायम आहे. शहरात बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्यासाठी क्रेनच्या माध्यमातून कारवाई केली जात असली तरी क्रांती चौकात उभे असणाऱ्या वाहतूक पोलिसांना क्रांती चौकातील बेशिस्त वाहने दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या चौकातील बेशिस्त वाहनांवर पोलीस कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
फोटो - ०४०४२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.