कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी केलेल्या प्रतिष्ठेच्या निवडीमध्ये अखेर त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी बाजी मारली. जिल्हा परिषदेचे २३ वे अध्यक्ष म्हणून राहुल पाटील यांची तर उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी काम पाहिले.
राजर्षी शाहू महाराज सभागृहात दुपारी २ ते २.२० या वेळात ही प्रत्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली. भाजप, जनसुराज्य पक्षाने विरोधी अर्जच दाखल न केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडीनंतर पाटील, शिंपी समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.
सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहावर मुश्रीफ, सतेज पाटील यांनी राहुल पाटील आणि शिंपी यांच्या नावाची घोषणा केली. तोपर्यंत दाखल करावयाचे अर्ज आणले गेले. पक्षप्रतोद उमेश आपटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या पुढाकाराने ते भरून दाखल करण्यात आले. दुपारी पावणे दोनच्या सुमारास गुलाबी फेटे बांधलेल्या सत्तारूढ महाविकास आघाडीच्या सदस्यांचे जिल्हा परिषद आवारात आगमन झाले. या ठिकाणी भाजप जनसुराज्यचे सदस्य आधीच आले होते. त्यांनीच या सर्वांचे स्वागत करून पाटील, शिंपी यांचे अभिनंदन केले आणि सर्व जण आत गेले. यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. अन्य कोणाचाही अर्ज न आल्याने पाटील आणि शिंपी यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पवार यांना प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, अरुण जाधव यांनी सहकार्य केले.
चौकट
पी. एन. यांचा महाडिक, घाटगे यांना फोन
राहुल आणि शिंपी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पी. एन. पाटील यांनी लगेचच भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांना फोन करून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यानुसार या दोघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी चर्चा करून अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
जे विरोधात तेच पाठिराखे...
जिल्हा परिषदेत नवे सभागृह सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसकडून राहुल पाटील यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु त्यावेळी भाजप सत्तेत होता. त्यात अप्पी पाटील यांचे सदस्य ऐनवेळी हातातून निसटले, शिवाय काँग्रेस व राष्ट्रवादीतील प्रत्येकी एक सदस्य व भरमू पाटील यांचे सदस्य सोयीचे आजारी पडले. आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांचे दोन सदस्य विरोधात गेले. दोन्ही काँग्रेसचे गणित जुळत नाही म्हटल्यावर स्वाभिमानीही भाजपकडे केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून राहुल यांची संधी हुकली होती. हे गत निवडणुकीत विरोधात गेले तेच या निवडणुकीत राहुलसाठी आग्रही राहिल्याचे चित्र यावेळी दिसले.
१२०७२०२१ कोल राहुल पाटील झेडपी ०१
१२०७२०२१ कोल जयवंतराव शिंपी झेडपी ०२