: महाडिक वसाहतीमधील महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्राची सध्या प्रचंड दुर्दशा झाली आहे. या केंद्राच्या आवारात कचरा व मुरूम मातीच्या ढिगाऱ्यांमुळे हा परिसर अस्वच्छ बनला असून, या केंद्राकडे जाण्यास नागरिक धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या केंद्राची पडझड थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. एक एकर परिसरात आरोग्यवर्धिनी केंद्र आहे. नगरसेविका सीमा कदम यांचा विकासनिधी व शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत या केंद्राची रंगरंगोटी करून आवाराला कम्पाउंड घातले आहे; मात्र दक्षिण नैऋत्य बाजूने केंद्राच्या समोरील दोन प्रवेशद्वारांना कुलूपबंद गेट नसल्यामुळे येथे आओ जाओ घर तुम्हारा, अशी स्थिती आहे. परिसरामध्ये सुरू असणाऱ्या बांधकामासाठी दगड, मुरूम व माती भरून येणारी वाहने या केंद्राच्या आवारातच विनापरवाना मालाचे ढीग खाली करत आहेत. त्यामुळे या केंद्राभोवती कचरा व मातीचे ढीग साठले आहेत.
चौकट : या केंद्राच्या आवारातच नागरिक उघड्यावर शौच करत असल्याने हा परिसर अस्वच्छ बनला आहे. शहरांमधील सध्या सुरू असलेल्या कोरोना, डेंग्यूसारखे आजार बळावत असताना येथील अस्वच्छता नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी होत आहे.
कोट : नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुविधा पुरवण्यासाठी कसलीही तडजोड केली जाणार नाही. लवकरच आयुक्तांशी चर्चा करून या केंद्राच्या अपुऱ्या कामांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने कार्यवाही होईल. या परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच मी भेट देणार आहे. ऋतुराज पाटील, आमदार दक्षिण विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर.
कोट : निधी अपुरा पडल्यामुळे केंद्रासाठी कम्पाउंड, कुलूपबंद गेट तसेच अन्य महत्त्वाची कामे पूर्ण करता आली नाहीत; मात्र सध्या साथीचे आजार बळावत असल्याने आयुक्तांकडून खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून तातडीने या केंद्राच्या विकासासाठी कार्यवाही करू.
नेत्रदीप सरनोबत.
शहर अभियंता, महापालिका.
कोल्हापूर.