लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील विभागीय क्रीडा संकुलाला श्री छत्रपती संभाजी महाराज असे नाव देण्यात यावे यासह खोळंबलेली कामे आणि नामकरणासाठी झालेला विलंब, याबद्दल संतप्त मावळा कोल्हापूर संघटनेच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. उर्वरित कामे १४ मे पर्यंत न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संभाजीनगर रेस कोर्स परिसरातील विभागीय क्रीडा संकुलाचे काम गेली कित्येक वर्षे खोळंबले आहे. ते त्वरित पूर्ण करून संकुलास श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी करवीरकरांतून केली जात आहे. या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शिव-शाहू-संभाजी प्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याने शनिवारी मावळा कोल्हापूर संघटनेतर्फे क्रीडा संकुलासमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान, संघटनेचे कार्यकर्ते राकेश गवळी यांनी १८ हजार रुपये खर्चून बनविलेला श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल असे नामकरण असलेला फलक क्रीडा संकुलाच्या कमानीवर लावला. त्यानंतर शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. या आंदोलनावेळी उपस्थित असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे क्रीडा संकुलाचे नाव छत्रपती संभाजी महाराज असे करावे, अशी मागणी करू, असे सांगितले. येत्या १४ मेपर्यंत छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाची शासन दरबारी नोंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा फत्तेसिंग सावंत यांनी दिला. यावेळी उमेश पोवार, सुजित जाधव, दर्शन चौगुले, रणजित देसाई, अशोक पोवार, रमेश मोरे, अजित सासणे, गणेश देसाई, गुरुदास खराडे, जयवंत निर्मळ यांच्यासह शिव-संभाजीप्रेमी उपस्थित होते.
( फोटो स्वतंत्र देत आहे आदित्य)