कोल्हापूर : शहरात तांत्रिक कारणामुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे वारंवार अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्याचा शहरवासीयांना नाहक त्रास होत आहे. याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात, त्याचबरोबर संभाव्य पूर परिस्थितीबाबत सर्व नियोजन करावे, अशी मागणी महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
शिंगणापूर पाणी उपसा केंद्राकडून पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणीपुरवठा करणाऱ्या चार पंपापैकी दोन पंप बंद पडले आहेत. हे पंप सुरू होण्यास आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने उद्यापासून शहरासह पाणीपुरवठा एक दिवसाआड होणार आहे. यापूर्वीही धरणातून पाणी सोडले नसल्यावरून पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने झाला होता. याबाबत प्रश्नाकडे शुक्रवारी महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधले.
माजी गटनेते शारंगधर देशमुख यांनी तांत्रिक कारणासह पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी शहरात पाणीपुरवठा अपुरा आणि अनियमित होत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना केली. यावर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होत आहे. त्यावर उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले.
माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी संभाव्य पूर परिस्थितीबाबत महापालिकेने ज्या प्रभागात पुराचे पाणी येते त्याबाबत काय नियोजन केलंय, पुराचे पाणी शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी या प्रभागात सर्वप्रथम येते. त्या ठिकाणी काय तयारी केलीय अशी विचारणा केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेने सर्व तयारी केली असून यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचे सांगितले.
यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते, सुनील पाटील, राहुल चव्हाण, उपायुक्त निखिल मोरे, रविकांत अडसूळ, सहायक आयुक्त संदीप घार्गे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, स्थानक अधिकारी मनीष रणभिसे, आशपाक आजरेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १८०६२०२१-कोल-केएमसी मिटींग
ओळ - कोल्हापूर शहरातील अपुरा पाणीपुरवठा तसेच संभाव्य पूर परिस्थिती यासंबंधी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, शारंगधर देशमुख, सुनील पाटील, राहुल चव्हाण यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.