कुंभोज : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीस बिनविरोध एका जागेसह मिळालेले आठचे संख्याबळ दोन अपक्षांच्या पाठिंब्यामुळे दहा होऊन आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, लोकविकास आघाडीने बिनविरोध जागेवर दावा सांगून सत्तास्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नास अद्याप तरी यश आले नसल्याने दावेदार चार सर्वसाधारण महिलेपैकी महाविकास आघाडी सरपंचपदी प्रथम कोणाला संधी देणार याबाबत ग्रामस्थांत कुतूहल पसरले आहे. ग्रामपंचायतीच्या अटीतटीसह चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विरोधी लोकविकास आघाडीस चार, तर अपक्षांनी पाच जागांवर विजय मिळविला. पाचपैकी दोन अपक्षांनी महाविकास आघाडीस तत्काळ पाठिंबा दिला. तथापि याच दरम्यान लोकविकास आघाडीने बिनविरोध जागेवर आपला दावा सांगून चार अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेसाठी बाह्या सरसावल्याने महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या वाटेत काही दिवस अडथळे निर्माण झाले.
दरम्यान, बिनविरोध महिला उमेदवाराने महाविकास आघाडीशी असलेली एकनिष्ठता कायम ठेवल्याने ग्रामपंचायतीत महाविकासच्या सत्तास्थापनेच्या मार्गातील अडसर दूर होऊन सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट झाले आहे. याशिवाय आणखी दोन अपक्षांनी महाविकासला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ आता बारा होणार आहे. महिला सरपंच पदासाठी आघाडी कोणाला संधी देणार, याबाबत ग्रामस्थांत कुतूहल निर्माण झाले आहे.