बालेचॉँद हेरवाडे - पट्टणकोडोली परिसरात खासगी सावकारी मोठ्या प्रमाणात फोफावली असून, सावकारांच्या व्याज व कर्जाच्या तगाद्याला कंटाळून अनेकजण आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून, दिवसेंदिवस सावकारीचा फास वाढतच आहे. करवीर तालुक्यातील वसगडे येथून पैसा पुरवून त्या त्या गावातील काही युवकांच्या माध्यमातून ही सावकारकीची चेन चालवली जाते. यामध्ये काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच चांदी उद्योजक व पतसंस्थाही कार्यरत आहेत. मात्र, अवैध सावकारकीकडे पोलिसांनी कानाडोळा केला असल्याने खासगी सावकारांकडून दंडुकशाहीचा वापर करून अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी केली जात आहे.पट्टणकोडोलीसह हुपरी, तळंदगे, इंगळी आणि रेंदाळ या गावांमध्ये खासगी सावकारकी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आठवडा भिशी, हप्ता भिशी, कार्ड भिशी, तसेच वैयक्तिक माध्यमातून कर्जदारांना कर्ज पुरवून हा व्यवसाय चालवला जात आहे. कर्जदारांच्या गरजेनुसार कर्जावरील व्याज आकारणीचा टक्का घेतला जात असल्याने १० ते १५ टक्क्यांपर्यंत व्याज आकारणीचा धडाका येथील सावकारांनी सुरू केला आहे. वसगडे येथील काही परवानाधारक सावकार जादा व्याज मिळविण्याच्या हेतूने त्या त्या गावामध्ये एक युवक वर्गाची फळीच तयार करत आहेत. वरकमाईच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासापोटी हे युवक सावकारी व्याजाचा टक्का वाढवत आहेत. त्यामुळे पूर्वीच आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना हे व्याज परतफेड करणे जमत नसल्याने हा वाढीव टक्काच त्यांच्या जिवावर बेतत आहे.संबंधित कर्जदाराला कर्ज देताना घर, शेती लिहून तसेच कोरे स्टॅम्प, चेक घेऊन कर्ज दिले जाते. कर्जावरील व्याज आकारणी पठाणी स्वरूपाची असल्याने काही महिन्यातच व्याजाची रक्कम दुप्पट होते. त्यामुळे कर्जदाराला व्याज व कर्ज परतफेड करणे अशक्य बनते. त्यामुळे लिहून घेतलेल्या कागदपत्रांच्या जोरावर सावकारांकडून दंडुकशाहीचा वापर करून त्यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रकार परिसरात मोठ्या प्रमाणात घडत आहे. यातूनच काहीवेळा सावकारांकडून कर्जदारास मारहाण करण्याचा प्रकार घडत आहे. यातूनच कर्जदारास मारहाण करण्याचा प्रकार घडत आहे. कर्जदारांकडून पोलिसांकडे दाद मागितली असता केवळ पोलिसांकडून त्यांच्यावर नाममात्र कारवाई करून प्रकरणावर पडदा पाडण्याचे काम होत आहे. त्यामुळे अशा सावकारीचे धाडस आणखीनच वाढत आहे.कर्जाला कंटाळून पट्टणकोडोली येथील एका महिलेने आठ दिवसांपूर्वीच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती; तर खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून येथील एका दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासगी सावकारांची दहशत वाढली असल्याची चर्चा सुरू आहे.बड्या चांदी उद्योजकांपासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेक लोक या सावकारीत गुंतले आहेत. त्यामुळे काहीवेळा कर्जदार गप्प बसत असल्याने त्यांची मालमत्ता सावकारांकडून काढून घेतली जात आहे. त्यामुळे आपली जीवन यात्रा संपवण्याचा मार्ग अनेकजण अवलंबत आहेत. गावातीलच एका पतसंस्थेच्या माध्यमातूनही ही खासगी सावकारकी मोठ्या प्रमाणात चालविली जात आहे. त्यामुळे वाढत्या खासगी सावकारकीला आळा घालून अशा सावकारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पट्टणकोडोलीत खासगी सावकारीच्या धाकाने आत्महत्या?
By admin | Updated: December 29, 2014 00:06 IST