कोल्हापूर : राज्य शासनाने दिलेली मुद्रांक शुल्क रकमेतील विशेष सवलत योजनेचा कालावधी एक वर्षासाठी वाढवून ३१ मार्च २०२२ पर्यंत करण्यात यावा, अशी मागणी पदवीधर मित्रचे संस्थापक-अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर यांनी केली आहे. प्रभारी सह जिल्हा निबंधक मनोहर भुत्ते यांना याबाबतचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, बांधकाम क्षेत्रातील मरगळ दूर होऊन शासनाच्या महसुलात वाढ व्हावी, यासाठी ऑगस्ट २०२० मध्ये मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर करण्यात आली. यानुसार कोणत्याही स्थावर मिळकतीवरील १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत संपणाऱ्या कालावधीसाठी मुद्रांक शुल्क ३ टक्के, तर १ जानेवारी ते ३१ मार्चअखेर २०२१ ला संपणाऱ्या कालावधीसाठी २ टक्क्यांनी कमी केले आहे. या योजनेद्वारे महापालिका क्षेत्रात खरेदी-विक्री व्यवहारासाठी ४ टक्के व बक्षीस पत्रासाठी ०.५ अर्धा टक्का तसेच ग्रामीण भागासाठी खरेदी-विक्री व्यवहारासाठी ३ टक्के व बक्षीसपत्रासाठी ०.५ असे मुद्रांक शुल्क ३१ मार्च २०२१ पर्यंत राहणार आहे. १ एप्रिलपासून सदरचा मुद्रांक शुल्क पूर्वीप्रमाणेच आकारले जाणार असून, महापालिका हद्दीत खरेदी-विक्री व्यवहारासाठी ६ टक्के व बक्षीसपत्रासाठी एक टक्का, ग्रामीण भागासाठी खरेदी-विक्री व्यवहारासाठी ५ टक्के व बक्षीसपत्रासाठी एक टक्का असे मुद्रांक शुल्क राहणार आहे. तरी या बाबींचा विचार करून सवलत योजना ३१ मार्च २०२२ पर्यंत सुरू ठेवण्यात यावी.
यावेळी विजय पोळ, राजू माने, तुकाराम भोसले, जगन्नाथ नाईक, प्रशांत कुलकर्णी, प्रकाश हिरेमठ, सुनील चव्हाण, दिनेश पोवार उपस्थित होते.
--
फोटो नं २७०३२०२१-कोल-माणिक पाटील
ओळ : मुद्राकं शुल्क रकमेतील सवलत योजनेची मुदत वाढविण्यात यावी, या मागणीसाठी पदवीधर मित्रच्यावतीने माणिक पाटील- चुयेकर यांनी प्रभारी. सह. जिल्हा निबंधक मनोहर भुत्ते यांना निवेदन दिले. यावेळी विजय पोळ, प्रकाश हिरेमठ, प्रशांत कुलकर्णी, सुनील चव्हाण, राजू माने, तुकाराम भोसले, जगन्नाथ नाईक उपस्थित होते.
--