येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देणे सुरू झाले. आरोग्य केंद्रांतही हे डोस मिळत होते. १८ वर्षांवरील लस सुरू झाल्यावर ग्रामीण रुग्णालयात अन्य लस बंद केली आहे.; पण गेल्या १५ दिवसांत लस उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी होत गेले आहे. हजारभर लोकांची मागणी आणि १००-१५० डोस येतात. यातून वादविवाद होत आहेत. गर्दी होत असल्याने भल्या पहाटे नंबर लावून दुपारी लस घ्यावी लागत आहे. लस संपल्यावर लसीकरण बंद केले की, दिवसभर थांबलेल्या लोकांचा संयम सुटत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक दवाखाना बंद झाला तरी दारात बसून राहत असल्याचे विदारक चित्र कागल शहरातील जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंचाही फज्जा उडत आहे.
जिल्ह्यातील लोकही कागलात
अठरा वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. या नोंदणीमुळे सोयीच्या ठिकाणी लस घेता येते. याचा लाभ घेत कागलच्या ग्रामीण रुग्णालयात इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर येथूनही अनेकजण लस घेण्यासाठी कागलला येत आहेत. कागलच्या लोकांचा नंबर लागत नाही, अशी स्थिती बनली आहे. याबद्दलही असंतोष पसरला आहे. दरम्यान, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली आहे.