कोल्हापूर : तांत्रिक बिघाडामुळे ज्या विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत ते मंगळवारपर्यंत (दि. १०) लावण्यात येतील, असे आश्वासन प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाद्वारे आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या परीक्षा दिलेल्या काही परीक्षार्थींचे निकाल लागलेले नाहीत. संकेतस्थळावरदेखील निकालाची माहिती उपलब्ध नाही. याठिकाणी निकाल राखीव, गैरहजर, कॉपी प्रकरण अशी विविध कारणे दिसून येत आहेत. निकाल लागला नसल्याने पुढील परीक्षेचे अर्ज भरण्याची, प्रवेशाची अडचण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निकालात दुरुस्ती करून तो लवकर जाहीर करण्यात यावा. निवेदन दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. भोईटे व परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षांचे निकाल योग्य वेळेत लागावेत. विद्यार्थ्यांना आॅनलाईन तक्रारीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळावी आदींची मागणी केली. त्यावर याबाबत सकारात्मक विचार केला जाईल तसेच तांत्रिक बिघाडामुळे ज्या विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत ते मंगळवारपर्यंत लावण्यात येतील, असे आश्वासन डॉ. भोईटे यांनी दिले. शिष्टमंडळात धैर्यशील माने, रोहित पाटील, झाकीर भालदार आदींसह विद्यार्थी निशिकांत पाटील, प्रवीण पाटील, अमित गडकरी, मंदार पाटील, अनिकेत पाटील, राहुल पाटील, रवी दिंडे, अवधूत चव्हाण, धीरज पाटील, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
विद्यापीठाचे प्रलंबित निकाल मंगळवारपर्यंत
By admin | Updated: March 7, 2015 01:04 IST