कोल्हापूर : कोरोना संसर्ग सुरू असतानाही शारीरिक अंतराच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या रंकाळा चौपाटी येथील ‘डी-मार्ट’ स्टोअरला महापालिकेच्या पथकाने चार हजार रुपयांचा दंड केला.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य शासनाने कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घालून दिले असून, नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी महापालिकेने विविध भरारी पथके स्थापन केली असून, या पथकामार्फत शहरामध्ये कारवाई सुरू आहे.
सोमवारी सहायक आयुक्त संदीप घार्गे, चेतन कोंडे, सुनील जाधव, आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने रंकाळा चौपाटी व त्याठिकाणी असलेले खाऊचे स्टॉल व डी-मार्ट याठिकाणी तपासणी केली. यावेळी डी-मार्टमध्ये नियमांचे पालन होत नसल्यामुळे त्यांना चार हजार रुपयांचा दंड करण्यात आला, तसेच रंकाळा चौपाटी येथे विनामास्क फिरणाऱ्या ९४ नागरिकांवर कारवाई करून नऊ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. फुलेवाडी नाका येथील हॉटेल कृष्णा डीलक्सवरही कारवाई करण्यात आली.