नंदकुमार ढेरे । चंदगड
कोरोनामुळे गेली सात महिने चंदगड आगारातून बंद असलेल्या बसेस पुन्हा जोमाने सुरू झाल्या असून, प्रवाशांनीही आता मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत बसमधून प्रवास करण्यास प्राधान्य दिल्याने चंदगड आगाराला दररोज सरासरी दोन लाखांचे उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती आगारप्रमुख गौतम गाडवे यांनी दिली.
चंदगड आगाराकडून प्रवाशांच्या सेवेसाठी मुंबई १, पुणे ४, निगडी १, सातारा १, सांगली १, कोल्हापूर २२, बेळगाव ३६ अशा बसफेऱ्यांसह तालुकातंर्गत विविध बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.
कोरोनामुळे तालुक्यातील प्रवाशांकडून एस.टी. प्रवासाला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र, गेल्या २०-२५ दिवसांपासून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोरोनामुळे अद्याप शाळा, महाविद्यालये नियमित सुरू झाले नसल्याने विद्यार्थी वर्गाचा प्रवास थांबला असल्याने मोजक्याच प्रवाशांना घेऊन बस वाहतूक सुरू आहे.
प्रवाशांच्या घटलेल्या संख्येमुळे महामंडळाने उत्पन्नाचा पर्यायी मार्ग म्हणून १० टनांपर्यंतची माल वाहतूक (वस्तू , साहित्य) ३८ रुपये कि.मी. दराने सुरू केली आहे. तसेच रिटर्न असल्यास ३६ रुपये दराने वाहतुकीची सोय उपलब्ध केली आहे. भविष्यात पार्सल सेवा हीदेखील सुरू करण्याचा मानस आहे.
कोल्हापूर-कोदाळी बससेवा सुरू केली असून, खराब रस्त्यामुळे इसापूर बससेवा सुरू केली असून, बांधकाम विभागाकडून वाहतुकीसंदर्भातील पत्र प्राप्त झाल्यावरच इसापूर बसफेरी सुरू होणार आहे.
-------------------------
वडापने काढले डोके वर
चंदगड-बेळगाव, हलकर्णी-फाटा ते बेळगाव असे वडाप सुरू झाले आहे. वडाप चालक चंदगड-बेळगाव बसच्या पुढे आपली गाडी पळवितात. बेळगावहून रात्री आठ वाजता सुटणाऱ्या गाडीच्या पुढे वडाप गाड्या सुटत असल्याने चार-दोन प्रवासी घेऊन रिकामी बस आणावी लागत आहे. याचा तोटा चंदगड आगाराला बसत आहे. याबाबत पोलीस व आरटीओकडे तक्रार करणार असल्याचे आगारप्रमुख गौतम गाडवे यांनी सांगितले.