लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : करवीर तालुक्यात दररोज शंभरहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण समोर येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरालगतची गावे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हॉटस्पॉट झाली असून आजूबाजूची गावे हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत.
करवीर तालुक्यात जवळपास ९५ गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. बघता बघता दुसऱ्या आठवड्यात या लाटेने उग्र स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. १ एप्रिलपासून प्रत्येक दिवशी रुग्णसंख्येत वाढ होत असताना गेल्या आठवड्यात ती प्रतिदिन १०० च्यावर बाधितांची संख्या होऊ लागल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडू लागली आहे.
१ एप्रिलपासून करवीर तालुक्यातील कोरोनाच्या बाधितांची संख्या ९५९ वर पोहचली आहे.
यात ९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. असे असले तरी लोकांमध्ये लॉकडाऊनबाबत निष्काळजीपणा वाढतच चालला आहे. सकाळी ७ ते ११ या काळात लॉकडाऊन शिथिल असताना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अत्यावश्यक सेवा सोडल्या तर व्यवसाय, उद्योग बंद असूनही रस्त्यावर गर्दी होत असल्याने चेन ब्रेक होणार काय, याबाबत शंका निर्माण होत आहे.
चौकट
१ लसीकरणाचा बोजवारा -- कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर ४५ वर्षांवरील लोकांना कोरोना लसीकरण करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी लसीकरणाला थंडा प्रतिसाद मिळत होता; पण जसजसा त्याचा उद्रेक सुरू झाला तशी लोकांनी लसीकरणासाठी धाव घेतली. त्यातच १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्याचा शासनाने निर्णय जाहीर केल्यानंतर लसीचा तुटवडा निर्माण झाला. मुळात लस पुरवठा कमी असताना असा निर्णय जाहीर केल्याने मोठी गर्दी होऊन आरोग्य केंद्रावर लांबच लांब रांगा दिसत आहेत. लस नाही मिळाली म्हणून अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार झाले आहेत.
२)करवीर तालुक्यातील हॉटस्पॉट गावे --शिंगणापूर, पाचगाव, उचगाव, आमशी, गडमुडशिंगी, मोरेवाडी, निगवे दु., गांधीनगर, वडणगे, बहिरेश्वर खुपिरे, सांगरुळ या गावांत कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे.
३)सकाळी रस्त्यावर गर्दी --सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान रस्त्यावर गर्दी होते. उद्योग व व्यवसाय बंद असल्याने दुपारनंतर रस्ते सुनसान होतात. तरीही लोकांमध्ये बेफिकिरी आढळून येते.
प्रतिक्रिया
सध्या लसीकरणासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी लसीकरणात लसीच्या तुटवड्याचा परिणाम होत आहे. ही परिस्थिती थोड्याच दिवसात सुधारेल.
जी. डी. नलवडे (तालुका आरोग्य अधिकारी)
लसीकरणासाठी शासनाने नियोजित कार्यक्रम ठेवायला हवा होता. प्रथम ४५ वर्षांवरील लोकांना ही लस द्यायला हवी होती. ते पूर्ण झाल्यानंतर १८ वर्षांवरील लसीकरण हवे होते; पण शासनाच्या ढिसाळ कारभाराने प्रत्येक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आहे. राजेंद्र सूर्यवंशी (पंचायत समिती माजी सभापती)
करवीर तालुक्यातील लसीकरणाचा लेखाजोखा
लसीकरणाला पात्र -- १ लाख ६० हजार
एकूण लसीकरण -- ६८ हजार, ४१ टक्के लसीकरण पूर्ण. दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या ९५९ मृत्यू -- ९
फोटो
लॉकडाऊन असला तरी भाजीपाला खरेदीसाठी लोकांची रस्त्यावर वर्दळ.