समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील स्वयंपाकघरे आणि स्वच्छतागृहांचा दर्जा आता त्याच्या छायाचित्रांवरून समजणार आहे. यासाठी शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड म्हणजेच स्वयंपाकघर, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सविधा असलेली आणि जिओ टॅगिंग केलेली छायाचित्रे अपलोड करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
राज्यातील सर्व शाळांबाबतची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या युडायस प्लस या पोर्टलवर उपलब्ध आहे. यामध्ये विद्यार्थिसंख्या, शिक्षकसंख्या, उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा या माहितीचा समावेश आहे. शासनाला धोरणे आखताना किंवा विकास आराखडा तयार करताना याचा उपयोग होत असतो. परंतु अजूनही अनेक बाबतीतील माहिती शासनाला आवश्यक आहे.गाव, वाड्या, वस्तीचे ठिकाण, लोकसंख्येची घनता, जिल्हा, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे सध्या उपलब्ध नाही. यासाठी विभागाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेसोबत ४ फेब्रुवारी २०२५ रोजी करार केला आहे. या संस्थेकडे उपलब्ध असलेली माहिती आणि यूडायस प्लसवरील माहिती एकत्रित करून ही माहिती स्वतंत्र एका डॅश बोर्डवर उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी महास्कूल जिस हे ॲप विकसित करण्यात आले आहे.
३० एप्रिलपूर्वी माहिती अपलोड करणे बंधनकारकवर उल्लेखल्याप्रमाणे पाच छायाचित्रे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी ३० एप्रिलपर्यंत अपलोड करायची आहेत. तसेच ही माहिती ॲपवर भरताना संबंधित मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून ही छायाचित्रे अपलोड करण्याची खबरदारी घ्यायची आहे.
- राज्यातील प्राथमिक शाळा ६५ हजार ३२४
- माध्यमिक शाळा १९ हजार ७६७