कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरातील देवस्थान समितीतर्फे विक्री करण्यात येणारा लाडू प्रसाद रविवारी कमी पडल्याने भाविक व कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. याबाबतचा अहवाल देवस्थान समिती अध्यक्षांकडे सचिव शुभांगी साठे यांनी सादर केला असून, ठेकेदारासही जादा लाडू प्रसाद पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवडाभरात अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ प्रचंड आहे. प्रत्येक भाविक श्रद्धेपोटी अंबाबाई देवीचे दर्शन झाल्यानंतर देवीचा प्रसाद म्हणून देवस्थानतर्फे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला लाडू प्रसाद मोठ्या भक्तिभावाने विकत नेतो. रविवारी लाखोच्या संख्येने भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. मात्र, या भाविकांना लाडू प्रसाद काही विकत मिळाला नाही. त्यामुळे अनेक भाविकांनी देवस्थान समितीच्या कार्यालयात येऊन याबाबत तक्रार करीत कर्मचाऱ्यांशीही वादावादी केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. या तक्रारीची दखल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव शुभांगी साठे यांनी घेत ठेकेदार संस्थेला लाडू प्रसाद जादा पुरविण्याचे आदेश दिले. लाडू प्रसाद पुरवणाऱ्या संस्थेचा ठेका १३ जानेवारी २०१६ रोजी संपत आहे. त्यामुळे निविदा काढून पुन्हा ठेका देण्यास वेळ लागणार असल्याने समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. अंबाबाई मंदिरात भाविकांचा मोठा ओघनाताळ, ईद-ए-मिलाद आणि जोडून आलेला शनिवार, रविवार अशा सलग चार सुट्यांमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात गर्दीचा ओघ मोठा होता. चार दिवसांत परराज्यांसह राज्यातील सहा लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
प्रसाद जादा पुरविण्याचे सचिवांचे आदेश
By admin | Updated: December 29, 2015 00:21 IST