कोल्हापूर : अमेरिकेतील साऊथ कॅरोलिना विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरुंच्या सदिच्छा भेटीमुळे शिवाजी विद्यापीठ व साऊथ कॅरोलिना विद्यापीठ यांच्यामध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या संधीची कवाडे विद्यार्थी, शिक्षक, संशोधकांना खुली होतील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी गुरुवारी येथे केले.साऊथ कॅरोलिना विद्यापीठाचे कार्यकारी कुलगुरू डॉ. जेफ प्रिस्ट व बोर्ड आॅफ एशियन अमेरिकन हेरिटेज फाऊंडेशनचे अध्यक्ष अनुराग अग्निहोत्री यांनी शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.डॉ. भोईटे म्हणाले, साऊथ कॅरोलिना विद्यापीठाने भारतीय विद्यार्थ्यांना तेथे उपलब्ध असणाऱ्या संधी दर्शविण्यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. डॉ. प्रिस्ट यांच्या विद्यापीठ भेटीमुळे येथील विद्यार्थ्यांना परदेशात उपलब्ध संधींची माहिती होण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे येथे उपलब्ध असणाऱ्या साधन-सुविधांचीही माहिती त्यांना होईल. स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्राम, फॅकल्टी एक्स्चेंज प्रोग्राम याचबरोबर संशोधनपर संयुक्त उपक्रम हाती घेण्यासाठी ही भेट फलदायी ठरेल.डॉ. प्रिस्ट म्हणाले, भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेक संधी साऊथ कॅरोलिनामध्ये उपलब्ध आहेत. पुढील वर्षी विद्यापीठाचे कुलपती भारत भेटीवर येणार आहेत. त्यादृष्टीने आम्ही या सदिच्छा भेट दौऱ्याचे आयोजन केले आहे. यात देशातल्या महत्त्वपूर्ण विद्यापीठांना भेटी देत आहोत. शिवाजी विद्यापीठ व साऊथ कॅरोलिना विद्यापीठ यांच्यात कोणत्या बाबींवर सामंजस्य करार करता येऊ शकेल, यावर चर्चा झाली.कुलगुरू डॉ. भोईटे यांनी डॉ. प्रिस्ट व अग्निहोत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर दोघांनीही आपापल्या विद्यापीठांची माहिती देणारे चित्रफितींचे सादर केले. यावेळी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. आर.बी. पाटील, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. साहू, अधिविभागाचे आंतरराष्ट्रीय संबंध समन्वयक उदय पाटील, एस. एम. भोसले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सहकार्याची कवाडे खुली होण्यास संधी
By admin | Updated: April 10, 2015 00:30 IST