कुडाळ : एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पंचक्रोशी पाट आयोजित खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुरुष व महिला या दोन्ही गटांतील सामन्यांमध्ये मुंबई संघाचे वर्चस्व राहिले. पुुरुष गटात पहिला सामना ओम - कल्याण विरुद्ध उत्कर्ष-मुंबई उपनगर या संघामध्ये झाला. हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात पंकज चव्हाण व नीलेश चिंदरकर यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. त्यानंतर शाहू-सडोली विरुद्ध उजाला-ठाणे हाही सामना ९-९ असा बरोबरीत सुटला, तर संघर्ष-उपनगर या संघाने विजय क्लब, मुंबईवर एकहाती विजय संपादन केला. गुड मॉर्निंग, मुंबईने चेंबूर उपनगरला पराभूत केले. फोंडा पंचक्रोशी संघावर विजय क्लबने ५-१६ अशी मात करीत मोठ्या फरकाने विजय संपादित केला. महिला गटात पहिला सामना सुवर्णयुग, पुणे विरुद्ध शाहू शिंंगणापूर यांच्यामध्ये झाला. पुणे संघाने ३२ - २९ असा विजय मिळविला. महात्मा गांधी स्पोर्टस् क्लब, मुंबईने उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवित होतकरू ठाणे संघावर ४८-०९ असा मोठा विजय संपादन केला. या सामन्यात महात्मा गांधी स्पोर्टस क्लबच्या तेजस्वी पटेकर व सायली परू ळेकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले.होली क्रॉस, सावंतवाडी संघाने स्मिता पांचाळच्या खेळाच्या जोरावर २९-१३ने देवरूख स्पोर्टस, रत्नागिरी संघाला पराभूत केले. तसेच टागोरनगर उपनगर संघाने देवरूख संघावर ३२-२१ असा विजय मिळविला. या सामन्यात सायली फाटक हिने दमदार खेळाचे प्रदर्शन केले. दिलखुश संघाने सत्यम सेवा उपनगर संघावर ३६-१३ असा एकतर्फी विजय मिळविला, तर सत्यम उपनगर व पाट हायस्कूल या चुरशीच्या लढतीत सत्यम उपनगर संघाने पाट हायस्कूलवर २३-२० असा विजय मिळविला. स्पर्धा निरीक्षक दिनेश चव्हाण व पंचप्रमुख म्हणून सुधीर सावंत, सहाय्यक पंचप्रमुख शैलेश नाईक, प्रशांत वारिक, नंदकुमार नाईक यांनी काम पाहिले. या स्पर्धेत पुरुष गटात बारा संघ सहभागी झाले असून, यात उत्कर्ष क्रीडा केंद्र (भांडुप), चेंबूर कें द्र (चेंबूर), विजय स्पोर्ट क्लब (दादर), गोलफा देवी क्रीडा मंडळ (गोरेगाव), नम्रता प्रतिष्ठान मंडणगड (रत्नागिरी), उजाला क्रीडा मंडळ भिवंडी (ठाणे), गुड मॉर्निंग (मुंबई), ओम कबड्डी कल्याण (ठाणे), शाहू सडोली (कोल्हापूर), फोंडा पंचक्रोशी (फोंडा), शिवशंभो (रायगड) यांचा समावेश आहे. महिला गटात बारा संघ सहभागी झाले असून, यात महात्मा गांधी स्पोर्ट क्लब (मुंबई), टागोरनगर मित्रमंडळ (विक्रोळी), शिवशक्ती (मुंबई), सत्यम सेवा मंडळ (कांजूरमाड), सुवर्णयुग (पुणे), ताराराणी स्पोर्ट क्लब (कोल्हापूर), सरोज स्पोर्ट क्लब (सांगली), होतकरू (ठाणे), हॉलीक्रॉस (सावंतवाडी), पाट हायस्कूल (पाट, कुडाळ), शिरोडकर स्पोर्ट क्लब (मुंबई), आदी संघांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)
सलामीला मुंबईचे वर्चस्व
By admin | Updated: December 21, 2015 00:26 IST