पालिकेचे दक्षिणेकडील शेवटचे टोक, ४५ लहान मोठ्या कॉलन्यांत विभागलेला, नऊ कि.मी.च्या परिक्षेत्रात विस्तारलेला, मध्यमवर्गीय वसाहती असणारा; परंतु रस्ते व गटारी या मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्र. ७० सुर्वेनगर. प्रभागाची समस्या म्हणजे, मुख्य रस्ते. साई मंदिर ते आपटेनगर या नगरोत्थानच्या रस्त्यास पाच वर्षे डांबर लागलेले नाही. रस्त्यावर पसरलेली खडी सुमार दर्जाची असून पॅचवर्क, अपघात हे नित्याचेच झाले आहे. अमर विकास कॉलनी ते दत्तोबा शिंदेनगर हा रस्ता विकसित करण्यासाठी शोधावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉलनी अंतर्गत रस्तेही सुमार दर्जाचे आहेत. प्रभागाचा ले-आऊटच नाही. त्यामुळे अस्ताव्यस्त वसाहती वाढताहेत. स्वतंत्र ड्रेनेजलाईन नाही. सांडपाण्याच्या निर्गतीकरणासाठी गटारी न केल्याने कोठेही सखल भागात सांडपाणी साठून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. प्रभागातील ओपन स्पेसवर क्रीडांगण, मंडई ऐवजी, उद्याने, सांस्कृतिक हॉल, विकसित झाले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या पालिकेच्या मालकी हक्कांच्या ओपन स्पेसची पालिका इस्टेट विभागाने झाडाझडती घेतल्यास वेगळेच सत्य बाहेर येईल. एका ओपन स्पेसवर सिंमेट विटा तयार करण्याचा कारखाना असून, त्याच्या प्रदूषणाने नागरिक त्रस्त आहेत. बापूराम नगर सांस्कृतिक हॉल, म.न.पा. हा प्रभागातील नागरिकांसाठी वापरायचा अल्प दरातील हॉल आता त्यातील ‘म.न.पा.’ गायब होऊन बापूसाहेब साळोखे सभागृह झाले; पण आता हे वैयक्तिक उत्पन्नाचे साधन बनू पाहतेय. शाळा, हॉस्पिटलसाठी आरक्षित असणाऱ्या जागेवर कॉम्पलेक्स बांधणीचा डाव नुकताच नागरिकांनी हाणून पाडला. पुईखडी फिल्टर हाऊसमधून थेट पाईपलाईनने प्रभागात पाणी आल्याने पाणी समस्येचे निराकरण झाले. मुख्य रस्त्यावरील व कॉलनी अंतर्गत बंद पथदिव्यांनी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.गेल्या चार वर्षांत नागरिकांच्या मूलभूत समस्या मार्गी लावण्यासाठी विस्तारित प्रभागात प्रयत्न केले. पालिका निधीसह आमदार निधीतून विकासकामे केली. नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ते विकासासाठी १ कोटी ७६ लाख खर्च, कॉलनी अंतर्गत रस्ते व गटारींसाठी दीड कोटी खर्च, ओपन स्पेसवर उद्याने विकसित करणार, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट प्रकल्प राबवून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विस्तारित प्रभागाच्या विकासकामांस मिळणारा निधी तोकडा असल्याने नागरिकांचा रोष पत्करावा लागतो. -इंद्रजित सलगर, नगरसेवक
ओपन स्पेस झाला बाजार...
By admin | Updated: January 23, 2015 00:44 IST