कोल्हापूर : स्त्रीजन्माविषयी सर्व प्रश्न समाजाने निर्माण केले आहेत. त्याची उत्तरे समाजाकडून मिळायला हवीत. बाईला आहे तशी स्वीकारा, तरच बाईपण दिसेल, असे प्रतिपादन अनुवाद सेतू संचालिका चंदा सोनकर यांनी केले. त्या राजर्षी शाहू स्मारक भवनात रविवारी झालेल्या साथी उमेश सूर्यवंशी लिखित बा.ई.प.ण आणि ‘विचारशलाका’ या पुस्तक प्रकाशनप्रसंगी बोलत होत्या. दाेन्ही पुस्तकांचे प्रकाशन उमा पानसरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पुरुषभान संवाद मंचचे प्रवक्ता कृष्णात स्वाती होते.
सोनकर म्हणाल्या, आज एक पुरुष बाईपण लिहितो ही समाधानाची बाब आहे. स्त्रीजन्माविषयी आणि नकुशी या शब्दाविषयी समाजानेच प्रश्न निर्माण केले आहेत. लेखक उमेश यांनी लिहिलेले हे पुस्तक आई, बहीण, मावशी, पत्नी, घरकाम करणारी महिला, आदींपर्यंत पोहोचवा. त्यामुळे स्त्रियांना मुक्त विचार करण्यास वाव मिळेल. त्याचे वाचन कुटुंबातील सर्व सदस्यांसमोर होणे गरजेचे आहे; तरच स्त्रीचे बाईपण सर्व पुरुष मंडळींना कळेल. खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानतेच्या वाटेवरून चालल्याचे या पुस्तकामुळे दिसून आले. आजच्या काळात बाईला कवच देऊ नका. नाही तर ती संकोचते. तिला चार भिंतींच्या आत ठेवू नका. तिचा संघर्ष तिला करू द्या. लिखाण करताना पुस्तकाचे शीर्षक महत्त्वाचे असते. आजच्या काळात स्त्री स्वतंत्र आहे. विचारानेही प्रलग्भ झाली आहे. स्त्रीभ्रूण, सतीप्रथा हेही बाईपण लादलेले आहे. डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्त्री आणि अंधश्रद्धा याविषयी अनेक पुस्तके लिहिली आहेत. अंधश्रद्धेविषयी स्त्रियांची मानसिकता बदलणे गरजेची बाब आहे.
उमा पानसरे म्हणाल्या, स्वत: चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याने स्त्रियांचे दु:ख कमी कमी करण्याचे या पुस्तकातून बीजारोपण केले आहे. बाईचे दु:ख स्वत:च्या नजरेने पाहून लेखक उमेशने लिहिले आहे, ही बाब म्हणजे स्त्री-पुरुष समानतेच्या वाटेवरून चालल्याचे लक्षण आहे.
यावेळी तनुजा शिपूरकर, सीमा पाटील, सुजाता म्हेत्रे, सुषमा सूर्यवंशी, आदी उपस्थित होत्या.
फोटो : ०४०४२०२१-कोल-प्रकाशन
ओळी : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात रविवारी साथी उमेश सूर्यवंशी लिखित ‘बाईपण’, ‘विचारशलाका’ पुस्तकांचे प्रकाशन उमा पानसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून सुषमा सूर्यवंशी, सुजाता म्हेत्रे, कृष्णात स्वाती, चंदा सोनकर, उमेश सूर्यवंशी, सीमा पाटील, तनुजा शिपुरकर उपस्थित होत्या.