इचलकरंजी : राज्यातील सर्व लघुदाब यंत्रमागधारकांना वीज बिलात सवलत मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय शहरातील यंत्रमागधारक संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला.
राज्यातील सर्व लघुदाब यंत्रमागधारकांना पूर्वीपासूनच वीज बिलात सवलत मिळते. मात्र, राज्य शासनाने जे यंत्रमागधारक वस्त्रोद्योग खात्याकडे ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करतील, त्यांनाच वीज बिलात सवलत मिळेल. ज्यांचे अर्ज येणार नाहीत, त्यांची सवलत रद्द केली जाईल, असा आदेश काढला. याच्याविरोधात संघटनेने वारंवार मागणी केली; परंतु हा निर्णय रद्दसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत मुदतवाढ देण्यात आली. महावितरण कंपनी वीज जोडणी देताना प्रत्येक यंत्रमागधारकाकडून लेखी स्वरूपात संपूर्ण माहिती घेते. तरीदेखील ऑनलाईन प्रक्रिया कशासाठी केली? ही ऑनलाईन प्रक्रिया फारच किचकट आहे. ही प्रक्रिया रद्द करून घेण्यासाठी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांना भेटून आपली समस्या मांडावी. मुंबईमध्ये वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख यांच्याशी बैठक घ्यावी, असे ठरले. यावेळी वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांच्यासह सर्व यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.