विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातून ‘शिववार्ता’ या युट्युब चॅनेलवरून या समारंभाचे थेट प्रेक्षपण होणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने दीक्षांत समारंभ होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील अन्य विद्यापीठांप्रमाणे शिवाजी विद्यापीठाने ऑनलाईन दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी हा समारंभ होणार आहे. सकाळी पावणेअकरा वाजता त्याची सुरुवात होईल. कुलगुरू कार्यालयापासून राजर्षी शाहू सभागृहापर्यंत मिरवणूक काढण्यात येईल. त्यात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे आणि चार अधिष्ठाता असतील. त्यानंतर मुख्य समारंभ होईल. त्यामध्ये यावर्षीच्या राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता विद्यार्थी सौरभ पाटील आणि कुलपती पदक विजेती विद्यार्थिनी महेश्र्वरी गोळे यांच्यासह चार विद्याशाखांमधील प्रत्येकी एका पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांची नावे घोषित केली जातील. त्यांच्यासह सर्व ७७,५४२ स्नातकांना पोस्टाच्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक पळसे यांनी दिली.
चौकट
पाच वर्षांपूर्वी ‘वेब कास्टिंग’चे पाऊल
ज्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठात उपस्थित राहता येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी विद्यापीठाने आपल्या संकेतस्थळावरून २०१५ मध्ये या समारंभाचे वेब कास्टिंग करण्याचे पाऊल टाकले. ते दरवर्षी केले जाते.