शरद यादव
कोल्हापूर : ऊस तोडल्यानंतर ५० टक्के वाढे शेतकऱ्यांना द्यावे, असा मार्गदर्शक नियम आहे; पण या नियमाला कात्रजचा घाट केव्हाच दाखवण्यात आला आहे. तोड सुरू असताना शेतकरी वाढे मागायला गेला तर केवळ ५ पेंढ्या देऊन बाकीचे सर्व वाढे विकले जात आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी आपल्याच फडातील वाढे विकत घेतो. एकूणच प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना नागवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अन्यायाचे हे दुष्टचक्र असेच सुरू राहणार आहे. याविरोधात वेळीच आवाज उठविला नाही तर साखर उद्योगच मोडून पडण्यास वेळ लागणार नाही.
साखर कारखाने लक्ष देत नाहीत, चिटबॉयचे कोणी ऐकत नाही, टॅक्टरमालक व मजूर म्हणतील तो दर व तोच तोडणीचा कार्यक्रम, चालकाची एन्ट्री वाढत जाणार असा सारा अंधा कानून सुरू असल्याने अल्पभूधारक शेतकरी पुरता हरला आहे. यावर मार्ग परदेशातून कोणी मसिहा येऊन काढणार नसून आता शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन जोरदार आवाज उठविण्याची वेळ आली आहे.
................
संचालक करतात काय?
कोल्हापूर जिल्ह्यात एका गावाआड कोणत्या तरी कारखान्याचा संचालक आहे. ऊसतोडणी यंत्रणेचा बोजवार उडाला असताना संचालकांनी यात हस्तक्षेप करून शिस्त लावण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक गावात बैठका घेऊन ऊसतोडीसाठी पैसे देणार नाही, क्रमपाळीनुसारच तोडणी होईल, चालकाला रुपयाही मिळणार नाही, असा ठराव ते का करत नाहीत. केवळ कारखान्याच्या मासिक मीटिंगला जाऊन चहा-बिस्कीट खाण्यासाठी संचालक झाला आहात काय, असा संतप्त सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.
..........
...तर कोल्हापुरी हातात घ्या
कोल्हापूर जिल्हा आजपर्यंत राज्याला दिशा देण्याचे काम करत आला आहे. हेल्मेट सक्ती विरोधातील आंदोलन आठवा, ऊस, दूध दराचे आंदोलन, टोल हटाव मोर्चा हे सारे काेल्हापुरातच घडले. मग अशा क्रांतिकारी भूमीत कोणीतरी टॅक्टरवाला तोडीसाठी पैसे मागतो, चिटबॉय त्याला प्रोत्साहन देतो, त्यावेळी हातात कोल्हापुरी घेऊन जाब विचारण्याची तयारी ठेवा. साखर कारखान्याच्या संचालकाला दरडाऊन सांगा, यात बदल झाला नाही तर तर पुढील निवडणुकीत दारात उभे करून घेणार नाही. लक्षात ठेवा ही लूट थांबवली नाही तर आज एकराला पाच हजाराचा दर उद्या खेपेला २ टन असा होईल. त्यावेळी ऊस शेती परवडत नाही म्हणून विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे साखरपट्ट्यात आत्महत्या होतील. राजांनो ती वेळ येऊ देऊ नका.
............
कोट...
आम्ही कारखान्यांकडून पत्रे घेऊन ५० टक्के वाढे शेतकऱ्यांना द्यायला लावले आहे, तसेच शिरोळ तालुक्यात एकही रुपया न देता ऊसतोडणीचा कार्यक्रम राबवत आहोत. शेतकऱ्यांनीही तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. तसेच गावागावांत कार्यकर्ते तयार झाले व त्यांनी याविरोधात आवाज उठविला तरच हा प्रश्न निकालात निघेल.
-धनाजी चुडमुंगे,
आंदोलन, अकुंश संघटना
............
कोट....
ऊसतोडणीसाठी पैसे मागणे आता सर्रास झाले आहे. वाढे मागितले तर ते मोळ्यांच्या खाली टाकून देतात. यावर तक्रार केली तर जाणीवपूर्वक वाड्यात चार कांंड्या ऊस धरून तसेच जमिनीलगत ऊस न तोडता नुकसान करण्याचे काम सुरू आहे. साखर कारखान्यांनी यावर कडक कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.
-शाहू गायकवाड,
शेतकरी, हुपरी (ता. हातकणंगले)