कोल्हापूर : कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. ‘एअर इंडिया’ने कोल्हापुरातून सेवा पुरविण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली. याबाबत त्यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याशी चर्चा केली.केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री पाटील म्हणाले, विमानतळाबाबत मुंबईत पालक सचिव आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण, एमआयडीसीचे अधिकारी यांच्या बैठकीला मला काही कारणास्तव उपस्थित राहता आले नाही. मात्र, या बैठकीत ‘एअर इंडिया’ने मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. यात एअर इंडियाने विमानसेवा पुरवीत असताना काही तोटा झाल्यास त्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी अट घातली आहे. सेवा पुरविण्यातील अडथळे दूर करण्यासह कंपनीने घातलेल्या अटींबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. सैनी यांच्याशी विमानसेवा आणि विस्तारीकरण याबाबत चर्चा केली. प्रारंभी डॉ. सैनी यांनी मुंबईतील बैठकीची माहिती देत विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या वन विभागाच्या जमीन हस्तांतरणाबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने तत्काळ प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना दिल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी प्रस्ताव सादर झाल्यानंतर शासन पातळीवरील विविध स्वरूपांतील मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करून महिन्याभरात प्राधिकरणाकडे संबंधित जमिनीचे हस्तांतरण केले जाईल. तसेच विस्तारीकरण आणि अन्य सुविधांच्या पूर्ततेबाबत दिल्ली येथे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)नितीन गडकरी यांचे स्वागत...खास विमानाने दिल्ली येथून सकाळी पावणेबाराच्या सुमारास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाले. याठिकाणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, राहुल चिकोडे, विजय जाधव, आदी उपस्थित होते. विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजच्या कार्यक्रमासाठी गेले. सायंकाळी पाच वाजता ते विमानतळावर आले. तेथून विमानाने ते मुंबईला रवाना झाले.
'वन' जमिनीचे महिन्यात हस्तांतरण
By admin | Updated: May 30, 2015 00:46 IST