लोकमत न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. चिकोत्रा खोरा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. सेनापती कापशी ( ता.कागल ) ही चिकोत्रा खोऱ्यातील मोठी बाजारपेठ आहे. जिल्हा परिषद मतदार संघातील मोठे गाव असल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये याची खबरदारी म्हणून शनिवारी दि.१९ जून ते मंगळवार दि.२९ जून दहा दिवस सेनापती कापशी शंभर टक्के लाॅकडाऊन करण्याचा निर्णय तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी संसारे , कोरोना समिती सदस्य व ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
येथील भावेश्वरी मंगल कार्यालयात तहसीलदार, गटविकास अधिकारी, लोकप्रतिनिधी व कोरोना दक्षता समितीची बैठक झाली. यामध्ये फक्त औषधे व दुग्धव्यवसाय यांना ठराविक वेळ मुभा देत बँंका, पतसंस्था, किराणा माल , बांधकाम , मटण मार्केट, सार्वजनिक कार्यक्रम आदिसह सर्व व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अत्यावश्यक सेवा वगळता परगावच्या लोकांना दहा दिवस गावात प्रवेश दिला जाणार नाही.
कर्नाटकमध्ये कोगनोळीजवळ राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने आजरा गडहिंग्लज मार्गे कोकणात जाण्यासाठी सेनापती कापशी येथे वाहनांची मोठी गर्दी होत आहे. गाड्या थांबून प्रवासी राजरोसपणे बाजारात फिरत आहेत यातून कोरोनाचा संभाव्य धोका नाकारता येत नाही . सेनापती कापशीसह चिकोत्रा खोऱ्यातील आसपासच्या गावात रुग्ण संख्या वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शंभर टक्के लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, आरोग्य अधिकारी विशाल शिंदे, शशिकांत खोत, उमेश देसाई, प्रदीप चव्हाण, उपसरपंच तुकाराम भारमल , मकरंद कोळी , दिपक कुरणे, प्रवीण नाईकवाडे आदीसह समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.