जयसिंगपूर : पैसे दामदुप्पट करून देतो असे आमिष दाखवून चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाण्याचे दोघे व शिरोळचा एक असे तिघांना आज, गुरुवारी जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. त्यांना येथील न्यायालयात उभे केले असता शनिवार (दि. २१)पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. हणमंत कदम (वय ४५), सतीशकुमार सिंग (४७, दोघे रा. कपूरबावाडी, ठाणे) व डॉ. जयपाल चौगुले (७२, रा. शिरोळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी महावीर जनगोंडा पाटील (७०, रा. १५वी गल्ली, जयसिंगपूर) यांनी जयसिंगपूर येथील न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. ठाणे येथील युनिमॅक्स रियल बिल्डकॉम या कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास एका वर्षात दामदुप्पट रक्कम मिळेल, अशी माहिती डॉ. चौगुले यांनी महावीर पाटील यांना सांगून त्यांच्याकडील चार लाख रुपयांची कंपनीत गुंतवणूक केली होती. आॅक्टोबर २०१० व ११ फेब्रुवारी २०१२ ला जयसिंगपूर व उदगाव येथे संशयित आरोपींनी फिर्यादी पाटील यांच्याकडून चार लाख रुपये रक्कम घेतली. याबाबतचा करार करून आयडीबीआय बँकेचा धनादेश फिर्यादीला दिला होता. कंपनीकडून मुदतीनंतर कोणतीच रक्कम न मिळाल्याने फिर्यादी पाटील यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतर या संशयित आरोपींना आज अटक करण्यात आली. अधिक तपास हवालदार ए. बी. चव्हाण करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात परिसरातील अनेक जणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)
एकास चार लाखांचा गंडा
By admin | Updated: June 20, 2014 01:09 IST