कोल्हापूर : एका मोबाईल कॉलवर शहरातील कोणत्याही दवाखान्यात गरजूंना जेवणाचा डबा पोहोचविण्याची सेवा संभाजीनगर येथील उद्योजक उमेश यादव यांनी सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विनामूल्य सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील विविध गावांतून काहीजण उपचारासाठी कोल्हापूर शहरातील विविध दवाखान्यांमध्ये दाखल होतात. त्यांच्या मदतीसाठी घरातील एक-दोन सदस्य त्यांच्यासमवेत येतात. त्यातील अनेकांचे शहरात कोणी परिचयाचे नसतात. जेवणाची व्यवस्था देखील नसते. अशा गरजू रूग्ण आणि त्यांच्या मदतीला दवाखान्यात असणाऱ्या कुटुंबीय, नातेवाईकांसाठी उमेश यादव यांनी दवाखान्यात जेवणाचा डबा विनामूल्य पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ही सेवा सोमवारपासून सुरू केली. अशा गरजू कुटुंबीय, नातेवाईकांनी त्यांच्या रूग्णाची खबरदारी, काळजी घ्यावी. आम्ही त्यांना जेवण पुरविण्याची जबाबदारी घेत असल्याची माहिती यादव यांनी दिली. गरजूंनी जेवणासाठी (९९२१४३०७७७ अथवा ९४२२६२०८०३) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.