कोल्हापूर : पुरोगामी विचारवंत डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या छायाचित्रावर एका संघटनेच्या कार्यकर्त्याने व्हाॅटस्ॲप ग्रुपवर आक्षेपार्ह विधान केले. तसेच एका अभिनेत्रीच्याही छायाचित्रावर अश्लील विधान केले आहे. अशा समाजकंटकावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पुरोगामी संघटना कृती समितीच्या वतीने शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली. यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश अधीक्षक बलकवडे यांनी सायबर सेलला दिले.
डाॅ. दाभोलकर यांचा ८ वा स्मृती शुक्रवारी (दि. १८) होता. या दिवशी कोल्हापुरातील एका संघटनेच्या कार्यकर्त्याने आपल्या मोबाइल क्रमांकावरून एका युवा मंचच्या व्हाॅटस्ॲप ग्रुपवर डाॅ. दाभोलकर यांच्या छायाचित्रावर आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्यासह मराठीतील एका आघाडीच्या अभिनेत्रीवरही अश्लील विधान केले आहे. याचा तपास करून संबंधित कार्यकर्त्यावर सायबर कायदा व आयपीसीच्या कलमान्वये गंभीर गुन्हे नोंदवावेत. डाॅ. दाभोलकर यांच्या खुनासंबंधी संबंधित कार्यकर्त्याची भूमिकाही तपासावी. गुन्हा नोंदवून न घेतल्यास नाइलाजाने न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक बलकवडे यांना देण्यात आला. यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सायबर सेलला तक्रारीच्या तपासाचे आदेश दिले. कोणत्याही राजकीय दबावाशिवाय हा तपास करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते गिरीश फोंडे, प्राचार्य डाॅ. विलास पोवार, शंकर काटाळे, अनिल चव्हाण, सीमा पाटील, गीता हसूरकर, संभाजी जगदाळे, बी.एल. बरगे आदी उपस्थित होते.