लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. खरेदीदाराकडे प्रवेश पास असेल तरच त्यांना मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडले जात आहे. त्याचबरोबर येत्या दोन दिवसात अडते, व्यापाऱ्यांनी ॲन्टिजन चाचणी करून घेणे बंधनकारक केले आहे.
बाजार समितीत भाजीपाला व फळे खरेदीसाठी मोठी गर्दी होते. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने समिती प्रशासनाने सौद्याच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावले आहेत. त्याचबरोबर प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, साबण, पाण्याची व्यवस्था केली आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका यंत्रणेने अचानक ॲन्टिजन चाचणी केल्यानंतर दहापैकी तिघे कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी किरकोळ खरेदीदारांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. घाऊक व्यापाऱ्यांना पास दिले असून सोमवारी पहाटेपासून पास पाहूनच प्रवेश दिला. समितीचे सचिव जयवंत पाटील, उपसचिवांसह अधिकारी व कर्मचारी पहाटे पाचपासून प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत होते. भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्यासह इतर विभागातील १६०० व्यापाऱ्यांना पास दिले आहेत. त्यामुळे गर्दी कमी करण्यात प्रशासनाला काहीसे यश आले.
दरम्यान, अडते, व्यापारी त्यांच्याकडील हमाल व तोलाईदारांना ॲन्टिजन चाचणी बंधनकारक केली आहे. त्यासाठी दोन दिवसांची मुदत समिती प्रशासनाने दिली आहे.
साडेसहा हजार क्विंटल कांद्याची आवक
बाजार समितीत सोमवारी भाजीपाला २४०० क्विंटल, फळे १०२३, तर कांद्याची ६५०० क्विंटल आवक झाली होती.