शहरात गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शहरात थंडी, तापाचेही रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व डेंग्यूचे वाढणारे रुग्ण यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. डेंग्यूमध्ये तीन दिवस थंडी-ताप व प्लेटलेट कमी होतात. त्यामुळे रुग्ण अशक्त होतो. गेल्या आठ दिवसांपासून प्रत्येक दवाखान्यात डेंग्यूचे रुग्ण आहेत. ही संख्या जवळपास ७० ते ८० झाली आहे.
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने नगरपंचायतीने सर्वत्र फॉगिंग मशीनच्या साहाय्याने औषध फवारणीला सुरुवात केली आहे. ज्या भागामध्ये डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत त्या ठिकाणी औषध फवारणीबरोबर अन्यत्रही औषध फवारणी सुरू केली आहे. नगरपंचायतीचे प्रकाश कांबळे, जयवंत कांबळे, धीरज ससाणे व बजरंग कांबळे हे औषध फवारणी करीत आहेत.
प्रामुख्याने अमराई गल्ली, दर्गा गल्ली, शिवाजीनगर, नबापूर या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, अन्यत्र प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वत्र औषध फवारणी सुरू आहे.
फोटो ओळी : आजरा शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेली औषध फवारणी.
क्रमांक : २७०६२०२१-गड-०५